पुणे :मस्तानी म्हटले की पुणेकरांच्या डोळ्यासमोर येतो तो थंडगार पदार्थ भरलेला पेला...ज्यात आटवलेल्या दुधात थंडगार दुधात गोळाभर आईस्क्रीम देण्यात येते. एवढ्यावरच या मस्तानीची कहाणी संपत नाही. या पेयाचा शोध पुण्यातच लागला आहे. शहरातील बुधवार पेठ भागात असलेल्या गुजर कोल्ड्रिंक हाऊसमध्ये हा पदार्थ सुरुवातीला बनविण्यात आला. १८२८साली सुरु करण्यात आलेल्या हा पदार्थ आईस्क्रीम कोल्ड्रिंक नावाने लोकांच्या पसंतीस उतरत होता. आबालवृद्ध ही आईस्क्रीम मस्तानी पिण्यासाठी मोठी गर्दी करत असत. अजूनही आरसे, जुन्या चित्रांच्या फ्रेम लावलेले हे दुकान सुवर्णकाळ जपत आहे. प्रत्येकच जण हा पदार्थ चाखल्याक्षणीच 'वा मस्तचं 'अशी प्रतिक्रिया नोंदवत असे. त्यामुळे मस्त लागणाऱ्या या पदार्थाचे नामकरण मस्तानी करण्यात आले. हळूहळू मस्तानी प्रसिद्ध झाली, रुळत गेली आणि आता तर ती सुमारे ३० पेक्षा अधिक फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे. आज पुण्यात अनेक प्रसिद्ध मस्तानीची दुकाने असून प्रत्येकाने आपली चव जपण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात खाद्य क्षेत्रात असणाऱ्या एका कंपनीने अशाच प्रकारे मस्तानीप्रमाणे असणारा पदार्थ बाजारात आणला असून तोही प्रसिद्ध झाला आहे. परदेशातून आलेली प्रत्येक व्यक्ती मस्तानीची चव चाखण्यास उत्सुक असते. थंड आणि आटवलेल्या गोड दुधात अलगद आईस्क्रीमचा चेंडू तरंगत ठेवला आणि वरून ड्रायफ्रुट्सची पखरण केली मस्तानी तृप्ततेची भावना देते. तेव्हा सध्या तापलेल्या वातावरणात हा इतिहास लक्षात घेऊन जवळच्या दुकानात मस्तानी प्यायला नक्की जा.