पुणे : नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल व पबला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने दणका देण्यात आला आहे. परवाना देताना घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्याच्या विविध भागांतील १० हॉटेल, पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.
विमान नगर येथील लेमन ग्रास रेस्टॉरंट, शिरूर येथील हॉटेल काकाज, कल्याणी नगर येथील ॲनोनियम कॅफे, हॉटेल ट्वीन स्टार, बॉलर्स, कोरेगाव पार्क येथील हॉटेल फ्रूशन, मेट्रो लाउंज, नारंग पार्क, प्लँज, आर्यन बार अँड ग्रील असे कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल, पबची नावे आहेत.
शहरात हायप्रोफाईल हॉटेल, पब, रूफटॉप बारची संख्या मोठी आहे. हॉटेल, पब यांना रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी दिले जाते, मात्र रात्री उशिरापर्यंत नियमबाह्य पद्धतीने हॉटेल, पब सुरू ठेवण्यात येतात. गेल्या आठ दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मागच्या आठ दिवसांत नियम मोडणाऱ्या पुण्यातील १० हॉटेल व पबवर कारवाई करण्यात आली आहे. - चरणसिंग रजपूत, अधीक्षक - राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग