बारामती : वाघळवाडी (ता. बारामती) येथे विनापरवाना बैलगाडा शर्यती घेतल्याप्रकरणी सुमारे २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरवारी (दि. १३) सकाळी दहाच्या दरम्यान वाघळवाडी गावाच्या हद्दीत एका शेतामध्ये शर्यतीचे मैदान तयार करून आरोपींनी विनापरवाना बैलगाडा शर्यती घेतल्याचे निदर्शनास आले.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिस नाईक ज्ञानेश्वर पांडुरंग सानप यांनी फिर्याद दिली आहे. अजय तात्याबा सावंत, जालीदंर शकर अनपट, शुभम उर्फ बाबु जाधव (पुर्ण नाव माहीत नाही) रुत्विक उर्फ बापु सावंत (पुर्ण नाव माहीत नाही), महादेव सकुंडे (पुर्ण नाव माहीत नाही), विकी सावंत (पुर्ण नाव माहीत नाही, सुहास गोरख जाधव, प्रणव उर्फ मोन्या बापुराव सावंत, सवाणे (पुर्ण नाव माहीत नाही) ( सर्व रा वाघळवाडी ता बारामती) जगताप (पुर्ण नाव माहीत नाही रा. मळशी वाणेवाडी ता बारामती) व इतर १० ते १५ अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी वाघळवाडी येथील एका शेतामध्ये २०० मिटर लांबीचे ४ फुट रूंद असे मैदान तयार केले होते. बैलगाडा शर्यत घेण्यापूर्वी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचे बैलगाडा शर्यत आयोजनाबाबत मार्गदर्शक सुचनांचा तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करुन विनापरवानगी बैलगाडी शर्यत आयोजन केल्याचे निदर्शनास आले. तसेय ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना मार्गदर्शक सुचनांचा देखील यावेळी हरताळ फासल्याचे दिसून आले. इतर नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरेल अशी कृती केल्याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार आर. एल. नागटिळक करित आहेत.