सासवड : सासवड शहरात विनापरवाना कोविड रॅपिड अँटिजेन टेस्ट करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाशी संलग्न पॅथेलाॅजीवर तहसीलदारांनी कारवाई करत ही लॅब सील केली.
पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, पोलीस अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींच्या पथकाने तक्रारीवरुन भेट दिली व तेथील काही रेकार्ड ताब्यात घेत प्राथमिक सीलची कारवाई काल केली. तर उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनाही याबाबत अहवाल तहसीलदारांनी दिला आहे.
प्रशासनाकडून वैद्यकीय क्षेत्रात सीलद्वारे कारवाईची ही पहीिलीच वेळ आहे. तहसीलदार रुपाली सरनौबत म्हणाल्या, सासवड शहरातील साळीआळी भागातील डाॅ. रवींद्र कुंभार यांच्या रूग्णालयालगत श्री पॅथेलाॅजी लॅब आहे. तिथे रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या जात होत्या. त्यासाठी आवश्यक ती शासनाकडील आरोग्य सेवेच्या जिल्हा शल्य चिकीत्सकांची परवानगी नसल्याचे प्रथमदर्शनी आढळले. तसेच उडवाउडवीची व अधांतरी उत्तरे दिली गेली. त्यामुळे या संबंधित लॅबमधील शासन यंत्रणेच्या परस्परचे विनापरवाना तपासणीचे कर्मचाऱ्यांमार्फतचे कामकाज थांबावे, यासाठी गुरूवारी ही लॅब सील करण्यात आली.