पिंपरी: कल्याण मटका जुगार व हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही कारवायांमध्ये ३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
महाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत येलवाडी येथे कल्याण मटका नावाचा जुगार खेळवला जातो. हॉटेल तुळजाभवानी मटण खानावळ या हॉटेलमध्ये विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारूच्या व बिअरच्या बाटल्यांची विक्री केली जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत १२ हजार २५० रुपये रोख, २४ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, सहा हजार २८० रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या व बियरच्या बाटल्या, १० रुपये किमतीचे कल्याण मटका जुगाराचे साहित्य, असा एकूण ४२ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दिनेश मच्छिंद्र बहिरट (वय ३५, रा. ता. खेड) याच्यासह इतर तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बहिरट कल्याण मटका जुगाराचा व हॉटेलचा चालक -मालक आहे. महाळुंगे पोलीस तपास पुढील करत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात अवैधरीत्या विक्री करण्यासाठी बीयरच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. सुधीर विठ्ठल राय (वय ४२, रा. जाधववाडी, चिखली), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा चारचाकी वाहनातून बियरच्या बाटल्यांची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी टोल नाका येथे सापळा रचून रविवारी छापा टाकला. त्यावेळी आरोपी कडे असलेल्या चारचाकी वाहनात बियरच्या बाटल्या मिळून आल्या. या कारवाईत १३ हजार ५०० रुपये किमतीच्या बियरच्या बाटल्या आणि २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन, असा एकूण दोन लाख ८८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास पुढील करत आहेत.