लोणी काळभोर : कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मादक द्रव्य पिण्यासाठी जाहिरात करून उत्तेजनात्मक आशय असलेला फ्लेक्स लावला म्हणून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ॲन्टी टेरेरीस सेल (ए टी सी) चे पोलीस नाईक प्रदिप भिमराव क्षिरसागर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून देविप्रसाद सुभाष शेट्टी (वय ३३, रा. बी/१००१, जयमाला बिजनेस कोर्ट, शेवाळावाडी, ता हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २१ जुलै रोजी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये बेकायदा किंवा आक्षेपार्ह जाहिरातींचे बॅनर, फ्लेक्स लावले आहेत काय याबाबत पेट्रोलिंग करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार प्रदीप क्षिरसागर व अक्षय कटके हे पेट्रोलिंग करत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारांस कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत एम आय टी युनिव्हर्सिटी कॉर्नर येथील द टिप्सी टेल्स नावाचे हॉटेल समोर पुणे सोलापुर महामार्गाचे लगत जाहिरातीचा फ्लेक्स लावला होता. त्यावर एम आय टी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी MIT Students Only, Welcome To Talliland, On 21st July, @ 799 UNLIMITED, Drinks For 2 Hours असा आशय लिहिण्यात आला होता. हॉटेल मालकाला फ्लेक्स लावण्यामागचे कारण विचारले असता त्यांनी सदरचा फ्लेक्स हा एम आय टी कॉलेजचे विद्यार्थी हॉटेलकडे आकर्षित व्हावेत. आणि व्यवसायाची विक्री वाढावी यासाठी लावलेला असल्याचे सांगितले. त्यामुळे हॉटेल मालक देविप्रसाद शेट्टी यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ७४, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ व जाहिरात नियंत्रण नियम २००३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.