लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचा कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’ दर पाच टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार ‘अनलाॅक’ची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (दि. ७) सुरू होईल. मात्र ‘अनलाॅक’ कशा प्रकारे याचा निर्णय दोन दिवसांची परिस्थिती पाहून घेण्यात येईल,” असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ४) विभागीय आयुक्तालयात साप्ताहिक कोरोना आढावा बैठक झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पवार बोलत होते.
पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यात तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह पुणे-खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये ‘पाॅझिटिव्हिटी’ दर चांगलाच कमी झाला आहे. यामुळे येथील नियम शिथिल करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व व्यापारी वर्गाकडून होत आहे. त्यानुसार शहरी भागातले नियम शिथिल केले जाणार आहेत. येत्या दोन दिवसातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोणते निर्बंध शिथिल करायचे याचा निर्णय घेण्यात येईल. “पुणे ग्रामीणचा ‘पाॅझिटिव्हिटी’ दर अजूनही १२-१३ टक्क्यांच्या दरम्यान आहे. यामुळे सध्या तरी ग्रामीण भागात नियम शिथिल केले जाणार नाही,” असे त्यांनीही स्पष्ट केले.
दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीचा विषय बैठकीत आला. आळंदी देवस्थानच्या अभय टिळक यांनी वारकऱ्यांची भूमिका पवारांपुढे मांडली. टिळक यांनी तीन पर्याय सरकारपुढे ठेवले. ते म्हणाले, “कोरोना साथ ओसरली तर पाचशे जणांना परवानगी द्यावी. कोरोना कमी झाला नाही तर दोनशे वारकऱ्यांना जाऊ द्यावे. स्थिती अगदीच बिघडली तर शंभर जणांना परवानगी द्यावी.”
चौकट
अजित पवार म्हणाले...
-सलून, ब्युटीपार्लर देखील सुरू करावेत अशी मागणी होत आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू.
-संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पंढरपूर आषाढी पालखी सोहळ्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती वारकऱ्यांशी चर्चा करून तीन-चार दिवसांत अहवाल देणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.