लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सोमवारपासून राज्यात अनलॉक सुरू होत आहे. तर यात लोकलसेवेचा देखील समावेश करावा, अशी मागणी प्रवाशातून होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून पुणे-लोणावळा लोकल तसेच पुणे-दौंड शटल (डेमू) या दोन्ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध आहेत. सामान्य प्रवाशांना यातून प्रवास करण्यास परवानगी नाही. त्यामुळे आता तरी सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी होत आहे.
राज्य सरकारने अनलॉक करताना स्थानिक प्रशासनाला परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. पुण्यात सोमवारपासून सर्व दुकाने सुरू होत असताना लोकल सेवादेखील पूर्ववत व्हावी. पुणे-लोणावळा लोकलमधून रोज सरासरी ५० ते ६० हजार प्रवासी प्रवास करतात. तर दिवसाभरात ४० ते ५० फेऱ्या होतात. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत असल्याने चार फेऱ्या होत आहेत. पुणे-लोणावळा लोकल व पुणे-दौंड शटल सेवा सुरू झाल्यावर पुणेकरांची मोठी सोय होणार आहे.
कोट १
राज्य सरकारच्या निर्देशानुसार रेल्वेने लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांस प्रवास करण्यास मुभा दिली आहे. सरकारने हे निर्बंध हटविल्यास रेल्वे प्रशासन सामान्यांसाठी देखील प्रवास करण्यास परवानगी देईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे
कोट २
सरकारने लोकल सेवेवर लावलेले निर्बंध आता हटविले पाहिजेत. रोज हजारो लोक लोकल व डेमूने पुण्यात दाखल होतात. लोकल तिकिटाचे दर सामान्यांना परवडणारे आहे. खासगी वाहनाने प्रवास करणे सामान्यांना परवडत नाही. लोकल सेवा सामन्यांसाठी सुरू झाली तर अनेकांचे प्रश्न सुटतील.
- हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे