पुणे : तो आपल्या भावाबरोबर खेळत होता. खेळण्याच्या बहाण्याने त्याला आराेपीने घरात बोलावले अन् त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार करणाऱ्या आरोपीला एक हजार रुपये दंड आणि सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. या प्रकरणात न्यायालयात सादर करण्यात वैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला.
दीपक भाऊ साळवे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी हा निकाल दिला. हा प्रकार वारजे परिसरात ३० मे २०१६ मध्ये घडला होता. पीडित मुलाच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून साळवेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातवीत शिकणारा पीडित मुलगा आणि त्याचा मोठा भाऊ खेळत असताना आरोपीने पीडित मुलाला त्याच्या घरी नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याबाबत कोणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पीडित मुलाने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. तेव्हा आईने अधिक विचारणा केली असता, पीडित मुलाने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्याचे वडील कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली होती. अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी सरकारी पक्षाकडून कामकाज पाहिले. तर गौरव जाचक यांनी तक्रारदाराच्या वतीने काम पाहिले. या खटल्यात सरकारी पक्षाने सहा साक्षीदार तपासले.