ठळक मुद्देहृदयरोग, श्वसनविकार, किडनी विकाराने मृत्यूचे प्रमाण अधिकगेल्या आठ वर्षांत प्राणी संग्रहालयातील २११ विविध प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू
विशाल शिर्के
पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेल्या ८ वर्षांत मृत्यूमुखी पडलेल्या २११ प्राण्यांपैकी बहुतांश प्राण्यांचा मृत्यू हा अनैसर्गिक झाल्याची माहिती हाती आली आहे. हृदयरोग, किडनी विकार, श्वसनविकार, रक्तातील संसर्गाचे प्रमाण जास्त असून, प्रसूती आणि प्राण्यांमधील भांडणामुळे देखील काहींचा मृत्यू झाला आहे. कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय राज्यातील एक प्रमुख प्राणी संग्रहालय मानले जाते. जलचर, सरपटणारे आणि विविध प्रकारचे सस्तन प्राणी येथे पाहायला मिळतात. त्यात विविध प्रकारचे साप, मगर, सुसर, कासव, वाघ, सिंह, बिबट्या, अस्वल, हरण, काळवीट, गवा, साळींदर, लांडगा, कोल्हा, मोर, गरुड, गिधाड अशा विविध प्रकारच्या प्राण्यांचा त्यात समावेश आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१०-११ पासून) प्राणी संग्रहालयातील २११ विविध प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या प्राण्यांचा मृत्यू वार्धक्यामुळे झाला आहे. तब्बल १७ प्राण्यांचा मृत्यू हा आपापसातील भांडणामुळे झाला असून, केवळ १३ प्राण्यांचा मृत्यू हा वार्धक्यामुळे झाला आहे. भांडणात एक स्पॉटेड डीअर, ३ सांबर ३, प्रत्येकी ४ बार्कींग डीअर, चिंकारा आणि काळविटाचा मृत्यू झाला. तर, मांजर आणि कोल्हा यांचे देखील भांडणात बळी गेले आहेत. जवळपास १८१ प्राण्यांचा मृत्यू हृदय विकार, श्वसनविकार, रक्तातील संसर्ग, रक्ताभिसरणासंबंधीचे आजार, रक्तस्त्राव, मूत्रपिंड-हृदयरोग असे एकापेक्षा अधिक अवयव निकामी होणे, अशा विविध कारणांमुळे झाले आहेत. एका जंगली मांजराने दुसºया मांजराची शिकार करुन मांस भक्षण केल्याची घटना २७ एप्रिल २०१७ रोजी घडली. गेल्यावर्षी २ आॅगस्टला एका दणकट चिंकाराने कळपातील साथीदाराचा पाठलाग केल्याने आणि ७ नोव्हेंबरला एका दणकट काळवीटाने दुसºया काळवीटावर धावा बोलल्याने हृदय विकाराचा झटका आल्याने काळवीट आणि चिंकाराला प्राण गमवावे लागले. गर्भात संसर्ग झाल्याने २ चिंकारांना प्रसूती दरम्यान प्राण गमावावे लागले आहे. जवळपास ४१प्राण्यांना हृदय विकार आणि श्वसन विकाराने मृत्यू आला आहे. त्यात चिंकारा ५, काळवीट १०, कोल्हा ३ , बार्कींग डीअर ६, मकॅक माकड २, चारशिंगा, स्पॉटेड डीअर ४ , नीलगाय २, मांजर २, सांबर ३ आणि प्रत्येकी एका गवा, लांगडा, बंगाल टायगरचा यात जीव गेला आहे. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. --------------------------------