पुणे : उत्पादनवाढीसाठी पिकावर अप्रमाणित औषधांचा मारा केल्याने राज्यातील ९२५ गावांमधील कापूस पिकावर मावा आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीतून समोर आले आहे. राज्य सरकारने उत्पादन वाढीच्या संप्रेरक औषधांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा औषधांपासून दूर राहावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश पिकांची पेरणी अथवा लागवड अंतिम टप्प्यात आहेत. कापूस पिकाखाली ३८.७५ लाख हेक्टर क्षेत्र येते. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कापसावर मावा, तुडतुडे, फुलकिडे या सारख्या रस शेषणाऱ्या कीडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागातर्फे राज्यात कापूस पिकावरील कीड व रोग सर्वेक्षणासाठी क्रॉपसॅप ही योजना राबविली जाते. त्याअंतर्गत निवडक ठिकाणी दर आठवड्यास सर्वेक्षण केले जाते. त्या माध्यमातून कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडूून कीड आणि रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो. क्रॉपसॅपच्या अहवालानुसारराज्यातील ९२५ गावांमध्ये मावा, तुडलुडे आणि फुलडीडे यासारख्या रस शोषणाºया कीडीचा प्रादुर्भाव अधिकप्रमाणात असल्याचे आढळून आले. हीच परिस्थिती पाहणी न झालेल्या गावांतही झाली असण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. कापसावर संजीवके, हार्मोन्स आणि टॉनिकचा मारा केल्याचे आढळून आले आहे. या औषधामुळे पिकाची वाढ होऊन तिचा लुसलुशीतपणा वाढतो. पिकाच्या हिरवेपणात वाढ झाल्याने पीक जोमदार असल्याचे भासते. मात्र, ही अनावश्यक वाढच मावा, तुडतुडे आणि फुल किड्यांना आमंत्रित करते. केंद्र आणि राज्य सरकारने मान्यता न दिलेल्या औषधांच्या फवारणीमुळी ही समस्या उद्भवली असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले. या औषधांमुळे कीडीचा प्रादुर्भाव होऊन कीटनाशकांच्या खर्चात वाढ होत आहे. या औषधांमुळे प्रत्यक्ष पिक उत्पादनवाढीसाठी किती फायदा होतो, त्याबाबत ठोस निष्कर्ष नाहीत. तसेच या प्रकारच्या औषधांच्या फवारणीची शिफारस कोणत्याच कृषी विद्यापीठाने केलेली नाही. या शिवाय कायद्याने देखील अशा औषधांना परवानगी नाही. आकर्षक जाहिरात, सुबक वेष्टन आणि विक्रेत्यांच्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे शेतकरी अशी औषधे फवारण्यास प्रवृत्त होत आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता अप्रमाणित औषधांचा वापर करु नये , असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अप्रमाणित औषधांनी केला कापसाचा घात : कृषी विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 5:06 PM
उत्पादनवाढीसाठी पिकावर अप्रमाणित औषधांचा मारा केल्याने राज्यात अनेक ठिकाणी कापसावर मावा, तुडतुडे, फुलकिडे या सारख्या रस शोषणाऱ्या कीडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देमावा, तुडतुडे, फुलकिडे रोगाचा प्रादुर्भाव केंद्र आणि राज्य सरकारने मान्यता न दिलेल्या औषधांच्या फवारणीमुळी समस्या