किशोर भगत / राजगुरूनगरगेली अनेक वर्षे वाहतूककोंडीच्या विळख्यात सापडलेल्या राजगुरुनगरवासीयांची सुटका, या प्रश्नामध्ये प्रशासनाने घातलेले लक्ष दिलासा देणारे असले, तरी सुचविलेल्या उपायांची कठोरपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ होण्याची शक्यता आहे.राजगुरुनगर शहरातील शिरूर-भीमाशंकर रस्ता (वाडा रस्ता) तसेच पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढती लोकसंख्या, अपुरे रस्ते आणि वाहनचालकांची बेशिस्त यामुळे दिवसेंदिवस या कोंडीमुळे वाढच होत आहे. उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांनी ३ महिन्यांपूर्वी कार्यभार घेतल्यानंतर दोनच दिवसांमध्ये त्यांना या वाहतूककोंडीचा अनुभव आला आणि त्यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह हा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेणार असल्याचे सांगितले. परंतु, आळंदी नगर परिषदेची निवडणूक आल्याने ही बैठक लांबली होती. मात्र, गेल्या आठवड्यात ही बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्ते, नागरिकांनी अनेक उपाययोजना सुचविल्या. आता प्रश्न आहे तो कठोर अंमलबजावणीचा!केदारेश्वर येथे भीमा नदीवर होणारा पूल आणि पुणे-नाशिक महामार्गाचे बाह्यवळण या दोन कामांमुळे खरे तर हा प्रश्न सुटणार आहे. परंतु, ही दोन्ही कामे होण्यासाठी किमान एक वर्ष तरी जाणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यामध्ये सध्या वापरात असलेल्या गढई मैदान ते पोलीस स्थानक या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नगर परिषदेकडून प्रथम त्याची दुरुस्ती होण्याची गरज आहे. तसेच, क्रीडासंकुलाशेजारील पुणे-नाशिक महामागार्ला जोडणाऱ्या रस्त्याचेही काम होणे आवश्यक आहे. शहरातील वाडा रस्त्यावरील अतिक्रमणे तसेच बेशिस्तपणे लावण्यात येणारी वाहने यांवर कारवाई होण्याची गरज आहे. यापूर्वी सुहास दिवसे व सुनील थोरवे या अधिकाऱ्यांनी त्यांच्या काळात कठोर भूमिका घेऊन अतिक्रमणे काढली होती. तशीच कारवाई या वेळी होण्याची गरज आहे. गावठाणातील कचेरी रस्त्यावर (मोमीनआळी) दोन्ही बाजूंनी दुचाकी लावल्या जातात. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे ठप्प होतो. त्यासाठी दिलावरखाँ दर्ग्याच्या बाहेरील जागेमध्ये पार्किंग केल्यास हा रस्ता खुला होईल. पुणे-नाशिक महामार्गावर सकाळी ९ पासून रात्री नऊपर्यंत पोलिसांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत सुरू असते. परंतु, या ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहनचालक लेन कट करून पुढे वाहने दामटतात आणि वाहतूककोंडी होते. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. या रस्त्यावर दुभाजक टाकावा, अशीही सूचना आली आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल. पाबळ रस्ताही मोठा झाला तरी तेथेही कडेला मोठी वाहने लावल्यामुळे वाहतूककोंडी होते.प्रशासनाला हवी नागरिकांची साथलग्नसराई व निवडणुकांचा हंगाम सध्या सुरू झाला आहे. त्यामुळे वाहतूककोंडीमध्ये भरच पडणार आहे. याशिवाय, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुका कधीही जाहीर होतील व प्रशासन पुन्हा निवडणुकीच्या कामामध्ये गुरफटणार असून, त्यामुळे या प्रश्नाकडे पुन्हा दुर्लक्ष होता कामा नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. यासाठी प्रशासनाला नागरिकांनीही साथ देण्याची गरज आहे.
बेशिस्त वाहतुककोंडीने हैराण
By admin | Published: January 11, 2017 2:34 AM