पुणे : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर आता गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील मंडळे आणि कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. त्यामुळे हा निर्बंधमुक्त गणेशोत्सव शहरात जल्लोषात साजरा होणार असल्याचे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी सांगितले आहे. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला.
सन १८९२ मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठविणाऱ्या गणेशाची ही मूर्ती. स्वत: भाऊसाहेबांनीच तयार केली होती. इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे ध्येय होते, त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत दिसते. दरवर्षीप्रमाणे ढोल ताशांच्या गजरात श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यंदा दिल्लीतील स्वामीरायण मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
बालन म्हणाले, कोरोनाची दोन वर्ष अतिशय खडतर परिस्थितीत गेले आहेत. आम्ही मागील दोन वर्षे सर्वांप्रमाणेच हौदात गणपती विसर्जन केला होता. पण यंदा कोरोनाचे गणरायाच्या कृपेने कोरोनाचे विघ्न दूर झाले आहे. त्यामुळे पुण्यातील सर्वच गणेश मंडळे जल्लोषात उत्सव साजरा करत आहेत. यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळात दहा दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच उर्वशी रौतेला, रणदीप हुडा, संजय दत्त, तेजस्विनी पंडित, अमृता खानविलकर असे अभिनेते श्रींच्या दर्शनासाठी येणार आहेत. वेद शाळेतील मुलांचे अथर्वशीर्ष पठण, लाफ्टर प्रयोग अशा कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
भाऊरंगारी भवन २४ तास ओपन राहणार
भाऊरंगारी यांच्या देवघराच्या आत भिंतीमध्ये त्यांनी शस्त्रे लपवली होती. काही वर्षांपूर्वी वाड्याची डागडुजी करताना ही शस्त्र सापडली. त्यात ९ रायफल, १५ पिस्तुले आणि गोळ्या यांचा समावेश आहे. नुकतेच वाड्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, ‘रंगारी भवन’ येथे या शस्त्रास्त्रांचे वेगळे दालन साकार करण्यात आले आहे. हे भवन आता २४ तास खुले राहणार असल्याचे बालन यांनी यावेळी सांगितले आहे.
उत्सवाबरोबरच सामाजिक उपक्रमांवरही भर
दोन वर्षात उत्सवात खंड पडला होता. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणतो. एकनाथ शिंदे यांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा केल्यानंतर सर्वत्र आनंद अन् जल्लोष सुरु झाला आहे. पुन्हा कार्यकर्ते एकमेकांना भेटू लागले आहेत. उत्सवाबरोबरच सामाजिक उपक्रमांवरही भर दिला जात असल्याचे बालन यांनी सांगितले आहे.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे 130 वे वर्षे
18 व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे हे एक क्रांतीकारक होते. ते राजवैद्य तर होतेचं पण त्यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय असल्याने त्यांना ‘रंगारी’ हे आडनाव रूढ झाले. शनिवारवाड्याच्या मागील बाजूला शालुकरांच्या बोळात असलेल्या त्यांच्या राहत्या वाडयात त्या काळात क्रांतीकारक एकत्र जमत असतं. रंगारी यांच्या देवघराच्या आत भिंतीमध्ये त्यांनी शस्त्रे लपवली होती. काही वर्षांपूर्वी वाडयाची डागडुजी करताना ही शस्त्र सापडली. त्यात 9 रायफल, 15 पिस्तुल आणि गोळ्या यांचा समावेश आहे. नुकतेच वाड्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, ‘रंगारी भवन’ येथे या शस्त्रास्त्रांचे वेगळे दालन साकार करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या विचारांपासून सर्वसामान्य माणूस दूर जात आहे या अस्वस्थतेतून इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी लोकांना एकत्र आणण्याकरिता भाऊसाहेब रंगारी एक माध्यम शोधत होते. त्यातून सहका-यांच्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार पुढे आला.1892 मध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मूर्तीची स्थापना केली. राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठविणा-या गणेशाची ही मूर्ती स्वत: भाऊसाहेबांनी तयार केली होती. इंग्रजांचा अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवून देण्याचे त्यांचे ध्येय होते त्याचे प्रतिबिंब या मूर्तीच्या घडणावळीत दिसते. कागद्याचा लगदा आणि लाकडी भुशापासून साकार झालेली ही 130 वर्षांची गणेशमूर्ती असून, ती काहीशी आक्रमक वृत्तीची आहे. दरवर्षी फक्त मूर्तीला रंगरंगोटी करून गणेशोत्सवात ही मूर्ती विराजमान केली जाते.1905 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांचे निधन झाल्यावर ही जबाबदारी काशिनाथ ठकूजी जाधव यांनी सांभाळली. ते वारल्यानंतर त्यांचे जावई दादा निकम यांनी धुरा सांभाळली. सध्यस्थितीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टमध्ये 9 विश्वस्त असून, मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत.