पुणे: पुणे शहर आणि उपनगरामध्ये आज सायंकाळपासून पावसाच्या सरींचे चित्र पाहायला मिळत आहे.पुण्यात पेठ भागासह आजूबाजूच्या परिसरातही काही ठिकाणी तुरळक, मध्यम अशा पावसाला सुरुवात झाली आहे. धायरी मध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ औंध, पाषाण, बाणेर, वारजे शिवणे, कर्वेनगर व उत्तमनगर परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. तर मध्यवर्ती भागात काही ठिकाणी तुरळक तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून असंख्य नागरिक घराबाहेर पडतात. त्यामुळे अशा अचानक सुरू झालेल्या पावसाने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्ते भिजल्याने काही ठिकाणी निसरड्या रस्त्यावर दुचाकी वाहने घसरल्याच्या एक दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची तारांबळही उडाली आहे. परंतु दिवसभर उन्हाच्या झळा सोसलेल्या पुणेकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. तसेच सर्वत्र मातीचा सुगंध दरवळत आहे. आल्हाददायक वातावरणात तारांबळ उडाली तरी नागरिक पावसाची मजा घेत आहेत. मार्च महिन्यात कधीही पावसाला शक्यतो सुरुवात होत नाही. पण यंदा उन्हाची तीव्रता वाढल्याने अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.
पुण्यात अवकाळी पावसाच्या सरी, शहरासह उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 6:49 PM
नागरिकांची उडाली तारांबळ
ठळक मुद्देउन्हाची तीव्रता वाढल्याने अचानक कोसळल्या पावसाच्या सरी