पुणे : दहा बाय दहाच्या खोलीतला संसार... पोटाला चिमटा काढून, काबाडकष्ट करून घरखर्च भागवताना होणारी दमछाक... मुलांची शिक्षण करताना स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना घालावी लागणारी मुरड... हे चित्र कष्टकरी वर्गातील महिलांचे आहे. स्वतःसाठी कोणतीही गोष्ट खरेदी करताना चारवेळा विचार करणाऱ्या या कष्टकरी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याेजनेतून दरमहा १५०० रुपये मिळणार असून, या पैशांचे मोल त्यांच्यासाठी माेठे आहे. घोषणा तर झालीये पण पैसे जमा होतील का? अशी शंका महिलांकडून उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर केली. या याेजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा हाेणार आहेत. यासाठीचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यात मिळणाऱ्या पैशांतून काही महिलांशी चर्चा केली असता त्यांनी मुक्तपणे आपली ‘बकेट लिस्ट’ सांगितली आहे. महिलांच्या अपेक्षा माफक आहेत. फक्त इतर योजनांप्रमाणे या योजनेचा बोजवारा उडू नये, असं त्या तळमळीने सांगत आहेत. आता त्यांच्या बकेट लिस्टची पूर्तता करण्याची जबाबदारी ‘भावा’ची म्हणजे मुख्यमंत्र्यांची आहे. या लाडक्या बहिणींना बँकेत पैसे कधी जमा होतात, याचीच उत्सुकता लागली आहे.
..हा जुमला नाही ना!
लाेकसभा निवडणूक २०१४च्या प्रचारादरम्यान प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १४ लाख रुपये जमा हाेतील, असे जाहीर करण्यात आले हाेते. पुढे ताे तर जुमला हाेता, असे सांगून हात झटकले गेले. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण याेजनेची घाेषणा झाल्याने अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. हक्काचे १५०० रुपये खरंच बँक खात्यात जमा होतील का? याबाबत महिला साशंक आहेत. विशेष म्हणजे, सरकारने काही वर्षांपूर्वी अशीच एक योजना आणली होती, त्यात महिलांच्या खात्यात विशिष्ट रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हाही आमच्याकडून कागदपत्रे मागविण्यात आली होती. त्यासाठी एक कार्डही आम्हाला देण्यात आले होते. मात्र बँकेत पैसे जमा झालेच नाहीत. आजही ते कार्ड मी सांभाळून ठेवले आहे, अशी नाराजी संगीता कांबळे यांनी व्यक्त केली.
...तोपर्यंत आमची खात्री पटणारी नाही
मी घरोघरी स्वयंपाकाची आणि पोळ्या लाटण्याची कामे करते. लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे; पण जोपर्यंत पैसे खात्यात जमा होत नाहीत, तोपर्यंत आमची खात्री पटणारी नाही. मिळालेच तर मी त्यातले १००० रुपये स्वतःसाठी ठेवेन आणि उरलेल्या ५०० रुपयांच्या रकमेतून शालेय शिक्षण घेणाऱ्या एखाद्या दिव्यांग मुलीला वह्या पुस्तके आणण्यासाठी मदत करेन. - राणी अरडे, महिला
माझे खूप वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण करेन
माझा दिवस सकाळी ८ वाजता सुरू होतो. तीन घरची धुणीभांडी करते; मग केटरिंगच्या कामाला जाते. माझ्या खात्यात पैसे जमा झाल्यावर एक काम कमी करेन. स्वतःसाठी ते पैसे ठेवेन. आजवर मला आई, भाऊ यांनी त्यांच्या बजेटनुसार साडी दिली आहे. पण जर १५०० रुपये मिळाले तर मी स्वतःच्या पसंतीची साडी घेईन. महागडी साडी नाही; पण बजेटमध्ये बसेल, अशी आवडीची साडी घेण्याचे माझे खूप वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण करेन. - हंसा, घरेलू कामगार