...तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 05:25 PM2024-07-14T17:25:59+5:302024-07-14T17:26:47+5:30
Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज बारामतीमध्ये जन सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता.
बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या बालेकिल्ल्यातून शक्तीप्रदर्शनाची सुरुवात केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज बारामतीमध्ये जन सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी भर पावसात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, विरोधकांकडून होणाऱ्या टिकेलाही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलतील असा खोटा प्रचार आमच्याविरोधात (महायुती) करण्यात आला. मात्र, चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावणार नाही. मी जो शब्द देतो, तो पूर्ण करतो. कुणी गैरसमज निर्माण केले तर आमचा महायुतीवर विश्वास आहे असं सांगा. शाहु-फुल-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात काम करत असताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ असा शब्द मी देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
आम्ही खोटं बोलणार नाही, सत्ता येते सत्ता जाते. सत्तेसाठी आम्ही हापापलेलो नाहीत. सत्तेचा ताम्रपाठ घेऊन कोणी आलेलं नाही. मिळालेल्या सत्तेचा वापर गरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी झाला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. तसेच, एमएसपी संदर्भात बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, मी काल अमित शाह यांची भेट घेतली व साखरेच्या संदर्भात त्यांच्याशी बोलणी केली. एमएसपी वाढवायला पाहिजे असं त्यांना सांगितलं. त्या संदर्भातील निवेदन त्यांना उद्या देणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही, आम्ही कोणाला धक्का लावू देणार नाही, हा तुमच्या दादाचा वादा आहे. #राष्ट्रवादी_जनसन्मान_रॅली#NCPJanSanmanRallypic.twitter.com/1sXdQVPMd1
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 14, 2024
महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. आम्ही कुठेही कांदा आयात केला नाही. दुधाची पावडर आयात केली नाही. दुधाचे दर वाढत नाही, तोपर्यंत प्रतिलिटरला सरकारने ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील लोकांना ही भाजीपाला दूध वाजवी दरात मिळाला पाहिजे. पण शेतकऱ्यालाही त्याची चांगली किंमत मोबदला मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, जगाची आर्थिक राजधानी मुंबई करायची आहे. चुकीच्या प्रचारावर, जो काही नॅरेटीव्ह सांगायचा प्रयत्न करतील त्यावर विश्वास ठेऊ नका. वरुणराजा सुद्धा आपल्यासोबत आहे, असे अजित पवार म्हटले.
याचबरोबर, जनसन्मान मेळाव्यातून प्रत्येक जिल्हा, तालुका ढवळून काढायचा आहे, असे सांगत आजची सभा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मात्र, यापुढे महायुतीच्या संयुक्त सभा होतील. विधानसभा निवडणुकीपर्यंत या सभा सुरु राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाला प्राधान्य दिले, विकासाला डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस काम करत राहील. हाच झंजावात आपल्याला चालू ठेवायचा आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.