पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कोरोना प्रतिबंधक लसी आणि रेमडेसिविर,ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, केंद्र सरकार जोपर्यंत आयात सुरु करत नाही तोवर लस आणि रेमडेसिविरचा तुटवडा कमी होणार नाही.तसेच असे स्पष्ट मत व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखविले आहे.
पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, राज्यासाठी रेमडिसिविरचा कोटा कमी करण्यात आला आहे त्यासंदर्भात आम्ही केंद्रांशी बोललो आहे. जामनगरमधील ऑक्सिजनचा जो 250 मेट्रिक टनचा कोटा होता तो कमी करण्यात आला आहे. तो कमी करू नका यासंदर्भात देखील केंद्रांशी चर्चा सुरु आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी बंद पडलेले ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले आहेत. राज्यातील साखर कारखान्यांना देखील ऑक्सिजन निर्मितीबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नवीन कोविड सेंटर उघडायचं असेल तर आरोग्य विभागाशी बोलूनच परवानगी दिली जाणार आहे.
पवार पुढे म्हणाले, मी माझ्या नेत्याचा सल्ला मानेन, महाविकास आघाडीचा सल्ला मानेन, बाकी कुणी काय सल्ला द्यायचा तो देऊ द्या.तो एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा, असा जोरदार टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.