...तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार' आम्ही निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू - हमीद दाभोलकर
By नम्रता फडणीस | Published: May 10, 2024 05:35 PM2024-05-10T17:35:35+5:302024-05-10T17:36:23+5:30
पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, डॉ नरेंद्र दाभोलकर खून या घटनांमधून हा व्यापक कटाचा भाग असल्याचे आम्ही नव्हे तर सीबीआय, एटीएस सारख्या तपास यंत्रणांनी हे वारंवार सांगितले आहे
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येथील विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे. तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. तब्बल अकरा वर्षांनी खटल्याचा निकाल लागला. या निकालावर हमीद दाभोलकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा लढा असाच सुरु राहणार असून आम्ही निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू असे त्यांनी सांगितले आहे.
हमीद दाभोलकर म्हणाले, आम्ही निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याचे सूत्रधार पकडले गेले नाहीत याची खंत आहे. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, डॉ नरेंद्र दाभोलकर खून या घटनांमधून हा व्यापक कटाचा भाग आहे हे आम्ही नव्हे तर सीबीआय, एटीएस, महाराष्ट्र एसाआयटी, कर्नाटक एसआयटी वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी हे वारंवार सांगितले आहे. बहुतांश वेळेला व्यापक कटातील सूत्रधार मोकळे सुटतात आणि प्यादी यांना बळीचा बकरा बनविले जाते. त्यामुळे सूत्रधारांना पकडण्यासाठी ही लढाई आम्ही सुरूच ठेवणार आहोत. या खुनाच्या तपास आणि खटल्याला ११ वर्षे लागली आहेत. आमची सुरुवातीपासून हीच भूमिका होती की काही लढाया आपली जबाबदारी म्हणून लढायच्या असतात. हार जीतच्या पलीकडे व्यापक प्रश्न पणाला लागलेले असतात. न्याय व्यवस्थेवरील विश्वास, सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या, विचार संपविण्यासाठी माणसाला संपविणे या प्रवृत्तीच्या विरोधातील हा लढा होता. जोपर्यंत ही प्रवृत्ती आहे तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
अंदुरे, कळसकर यांना जन्मठेप
निकालात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.