तळेगाव दाभाडे : मराठी माणूस हा कधीही एकत्र येणार नाही किंवा महाराष्ट्र कमकुवत राहील अशीच व्यूहरचना दिल्लीतून कायम केली गेली आहे. परंतु जोपर्यंत महाराष्ट्र आहे, तोपर्यंत आपले राष्ट्र शाबूत राहील, असे प्रतिपादन व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी यांनी केले.गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्राची समृद्ध परंपरा’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना घावटे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक संग्राम काकडे होते. नगरसेवक सचिन टकले, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बच्चुशेठ तांबोळी, कवयित्री शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर उपस्थित होते. घावटे म्हणाले की, ‘महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले’ असे सेनापती बापट यांनी म्हटले होते ते शब्दश: खरे आहेत. ‘भारतामध्ये जन्म होणे दुर्लभ आहे आणि महाराष्ट्रात जन्माला येणे हे तर अतिदुर्लभ आहे, असे प्राचीन संस्कृत वचन आहे. कारण ज्याच्या नावातच राष्ट्र आहे, असे महाराष्ट्र हे आपल्या देशातील एकमेव राज्य आहे. जगातील अनेक जगज्जेत्यांबरोबर शिवाजीमहाराजांची तुलना केली जाते. परंतु त्या जगज्जेत्यांच्या हयातीनंतर त्यांची साम्राज्ये लयास गेली; पण जंग जंग पछाडूनही मराठ्यांचे राज्य अबाधित राहिले. उलट पेशवेकाळात अटक ते कटक असे संपूर्ण भारतभर मराठ्यांचे राज्य होते आणि त्या काळात दिल्लीवर भगवे निशाण फडकले होते. व्याख्यानापूर्वी, पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘निसर्गराजा’ या संस्थेला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या संयोजनात उमाकांत महाजन, संदीप शेळके, सतीश देशपांडे, माधुरी देशपांडे यांनी सहकार्य केले. ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन, प्रा. जीवन पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
महाराष्ट्र असेपर्यंत राष्ट्र शाबूत
By admin | Published: March 20, 2017 4:18 AM