लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फळांवर आलेल्या बागांना अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. डाळिंब व द्राक्ष पिकाचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार ४०५ हेक्टर क्षेत्रावरील फळबागा बाधीत झाल्या असून महसूल विभागाने त्याचे पंचनामे सुरू केले आहेत.
जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाचा जास्त धुडगूस झाला. महिन्यात काढणीला येणाऱ्या द्राक्ष, डाळींबाच्या बागांचे यात नुकसान झाले आहे. अन्य तालुक्यातही अवकाळी पाऊस झाला, मात्र तिथे फारसे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
ही वेळ बागा ताणावर ठेवण्याची होती. त्यामुळे द्राक्ष बागांचे पाणी थांबवले होते. यामुळे द्राक्षमण्यांची वाढ चांगली होती. नेमका त्याचवेळी पाऊस झाल्याने द्राक्ष-डाळिंबाच्या दर्जावर वाईट परिणाम झाला आहे. एकूण ४०५ हेक्टरवरील बागांचे नुकसान झाले असल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. बाधीत शेतकऱ्यांची संख्या ५ हजारांच्या घरात असण्याची शक्यता आहे. महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.
चौकट
नियमानुसार मदत
“पुढील महिन्यात द्राक्ष काढणीवर आली होती. डाळिंबाचा हंगामही चांगला होता. पावसाने दोन्ही फळबागांचे नुकसान केले. नुकसानीचा अंतिम अहवाल लवकरच तयार होईल. बाधीत शेतकऱ्यांना नियमानुसार मदत मिळेल.”
-ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक