पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाले आहे. त्यामुळे सध्या मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. गुरुवारी सायंकाळी पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. शुक्रवारी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ०.२, कोल्हापूर १५, महाबळेश्वर ०.४, नाशिक १४, सांगली ३, सातारा ०.६ मिमी पावसाची नोंद झाली होती.
गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला होता. कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४४.६ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९.६ अंश सेल्सिअस होते.
राज्यात ३ मेपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा, तसेच हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.