पुणे : एका सात वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्यावर पाच जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना वारज्यामध्ये बुधवारी रात्री सव्वाआठ ते साडेनऊदरम्यान घडली. आरोपींनी क्रूरपणे त्याला मारहाणही केली असून, पीडित मुलाचे हृदय सरकल्याची माहिती पोलिसांनी दिली. खिळे असलेल्या पट्टीने मारल्यामुळे त्याच्या पाठीवर छिद्रे पडली आहेत. पीडित मुलाची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वारजे पोलिसांनी जलद गतीने तपास करीत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. नितीन व्यंकटेश भंडारे (वय २१), रवी माणिक पवार (वय २३, दोघेही रा. लक्ष्मीनगर, कोथरूड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबत दोन १७ वर्षीय आणि एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगा दुसरीमध्ये शिकण्यास आहे. पीडित मुलगा बुधवारी घराजवळील मंदिराजवळ खेळत असताना दारू प्यायलेल्या पाचही आरोपींनी त्याला गुपचूप उचलून नेले. जवळच असलेल्या खदानीमध्ये नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. मुलगा ओरडू नये म्हणून त्याचे तोंड दाबून धरण्यात आले होते. तसेच त्याच्या कानाचे हाडही मोडले आहे. सध्या या मुलावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान, त्याच्या पालकांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. मुलगा सापडत नसल्यामुळे आसपासचे नागरिकही त्याचा शोध घेत होते. आरोपी त्याला सोडून पसार झाल्यानंतर मुलगा रडत रस्त्यावर आला. तेथून जात असलेल्या दुचाकीस्वार तरुणाने त्याला सोबत नेऊन घरापाशी सोडले. या मुलाने हकिगत सांगितल्यावर चिडलेल्या नागरिकांनी वारज्याचे वरिष्ठ निरीक्षक गणपत पिंगळे यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त पी. एन. रासकर, उपायुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त आर. पी. गौड घटनास्थळी धावले. निरीक्षक पिंगळे, के. एस. पुजारी (गुन्हे) यांनी कोणताही सुगावा नसताना माहिती काढून आरोपींना गजाआड केले. आरोपींना पकडल्याची माहिती मिळताच संतापलेल्या नागरिकांनी त्यांना आपल्या हवाली करण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी परिस्थिती हाताळत सर्वांना शांत केले.
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2015 4:00 AM