पुणे : महापालिकेच्या नागर वस्ती विकास विभागात मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या समूह संघटिकांना नियुक्त करून घेण्यासाठी वयाची अट लागू केल्याने गेली अनेक वर्षे हे काम करणाऱ्या महिलांवर अन्याय होणार आहे. महापालिकेत प्रत्येक पदाधिकाऱ्याची भेट घेत या महिला आपल्यावरील अन्यायाची कैफियत मांडत आहेत. मात्र सत्तापद स्थिरस्थावर करण्यात मग्न असलेले पदाधिकारी व विरोधकही त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.नागर वस्ती विकास विभागामार्फत केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक तसेच सामूहिक लाभाच्या अनेक योजना राबवल्या जातात. या योजना वस्त्यांमधील गरीब कुटुंबांपर्यंत व्यवस्थित पोहोचाव्यात यासाठी समूह संघटिकांची नियुक्ती केली जाते. जुन्या प्रभाग रचनेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत अशा एकूण ९० समूह संघटिका काम करतात. त्यांना दर सहा महिन्यांनी कामावरून कमी केले जाते व काही दिवसांचा ब्रेक देऊन पुन्हा कामावर घेतले जाते. गेली अनेक वर्षे या पद्धतीने काम सुरू आहे. त्यांना त्यासाठी १२ ते १४ हजार रुपये मानधन दिले जाते. (प्रतिनिधी)
समूह संघटिकांवर बेकाराची कुऱ्हाड
By admin | Published: March 24, 2017 4:19 AM