डेक्कनच्या पुलावर असणाऱ्या छत्रपती संभाजीमहाराजांच्या पुतळ्याचे अनावरण १० आॅक्टोबर १९८६ रोजी अटलजींच्या हस्ते झाले होते. सुरेश नाशिककर त्यावेळी उपमहापौर होते. त्यांनी महतप्रयासाने अटलजींची तारीख मिळवली. संभाजीमहाराजांबाबत अटलजी काय बोलणार, असा बहुतेकांचा समज होता. प्रत्यक्षात मात्र अटलजींनी सव्वा तास भाषण केले. संभाजी महाराजांवरचे सर्व आक्षेप त्यांनी खोडून काढले. एकाही आक्षेपाला इतिहासात कसलाही पुरावा नाही, जे सांगितले जाते ते केवळ कथाकाव्यांमधून सांगितले जाते. आपले साहित्य प्रभावी करण्यासाठी म्हणून ही अनैतिहासिक जोड तत्कालीन लेखकांनी दिली. प्रत्यक्षात संभाजीमहाराज हे धर्मरक्षक,प्रचंड शारीरिक सामर्थ्य असणारे, रयतेप्रती कणव असलेले राजे होते, असे अटलजींनी ठासून सांगितले व अशा राजांच्या पुतळ्याचे अनावरण आपण अत्यंत भक्तीभावाने व अभिमानाने करतो आहे, असेही ते म्हणाले. संभाजीमहाराजांचे डोळे काढले गेले त्यावरही त्यांनी ‘आँखे निकाली तो क्या हुआ, स्वराज्य का सपना तो नही मिटा सका’, अशीरचना ऐकवली होती. सुरेश नाशिककर आजही त्या आठवणींनी गहिवरून येतात.
अटलजींच्या हस्ते झाले होते छत्रपती संभाजीमहाराज पुतळ्याचे अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 1:05 AM