पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसची मोठी अडचण होऊ लागली असून सध्याचे आघाडीचे सरकार आता तिघाडीचे सरकारच बनले आहे. सरकारमध्ये निर्णय घेताना कॉंग्रेसला फारसे विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे कॉंग्रेस हा सरकारमध्ये नको असलेला पाहुणा बनला असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली.
सोमवारी (दि. ११) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वादग्रस्त वक्तव्यामुळे काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वांदग निर्माण झाले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याने वाद आणखी उफाळून आला आहे. धोरणात्मक निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे कॉंग्रेसची अवस्था बिकट बनल्याचे भंडारी म्हणाले.
विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांचे निलंबन राजकीत हेतूने करण्यात आल्याचा आरोप करून भंडारी म्हणाले, सभापतीपदाची निवडणूक झाकण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने भाजपचे आमदार अनुपस्थित रहावेत यासाठीच ही कार्यवाही करण्यात आली. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सुरु आहेत.