लोकमत न्यूज़ नेटवर्क, बारामती: दिवाळी सण साजरा करण्यासाठी पवार कुटुंबीय बारामतीत उपस्थित आहेत. शनिवारी (दि ११) सकाळी पवार यांची माध्यम प्रतिनिधींनी भेट घेतली. यावेळी पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शनिवारी गोविंद बागेतून सकाळी १० वाजता एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे बैठकीसाठी गेले होते. दुपारी चार वाजता विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या बैठकीला ते पोहचले. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांनी कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितले.
खासदार सुळे यांनी तात्काळ हृदयरोग तज्ञ डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे यांना बोलावून घेत पवार यांची तपासणी केली. डॉक्टरांनी पवार यांचा एसीजी काढला. सततच्या कार्यक्रमांमुळे व विश्रांती न घेतल्यामुळे पवार यांना थकवा आल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले आहे . डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांचा आजचा पुरंदर दौऱ्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार दिवाळी पाडभेट कार्यक्रम ,व्यापारी वर्गासह चर्चा करण्यास आवर्जून उपस्थित राहतात.तो अनेक वर्षांचा शिरस्ता आहे .यंदा या कार्यक्रमाला पवार उपस्थित राहणार का ,याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान पवार यांची तपासणी करुन उपाचार करणाऱ्या डॉ रमेश भोईटे टीमचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह फोटो पोस्ट करीत आभार मानले आहेत.डॉ रमेश भोईटे ,डॉ सनी शिंदे ,डॉ प्रतीक पाभरकर ,डॉ चैतन्या इनामदार आदींच्या टीमने पवार यांची तपासणी केली.