पुणे : केंद्र सरकारकडून एकीकडे देशभरातील बाजार समित्या एकमेकांंना जोडून आॅनलाईन कृषी बाजाराची पायाभरणी केली जात असताना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला मात्र संकेतस्थळ अपडेट करण्यातही रस दिसत नाही. अद्याप संकेतस्थळावर ‘प्रादेशिक’ हाच शब्द झळकत असून प्रशासक म्हणून दीपक तावरे यांचेच नाव दिसते. तसेच, इतर कोणतीही नवीन माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली नाही.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आॅनलाईन कृषी बाजार या योजनेअंतर्गत देशभरातील बाजार समित्या आॅनलाईन एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांना आपला शेतमाल देशात कुठेही विकता यावा, विविध बाजार समित्यांमधील भावांची माहिती मिळावी, यासाठी देशातील बाजार समित्या आॅनलाईन पद्धतीने जोडण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये थेट शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या विक्रीचा व्यवहार आॅनलाईन करता येणार आहे. एकीकडे डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्राचा डांगोरा पिटला जात असताना भाजपाचे प्रशासकीय मंडळ असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला मात्र त्याचे वावडे दिसते. मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी मुख्य प्रशासकाचा भार स्वीकारल्यानंतर बाजार समितीतील कामकाज अधिक पारदर्शकपणे करण्याचे सूतोवाच केले होते. विविध सुविधा आॅनलाईन करण्याचे त्यांनी सांगितले; मात्र काही महिन्यांतच त्यांना याचा विसर पडला.बाजार समितीचे संकेतस्थळ अपडेट करायला प्रशालनाला वेळ नाही, असे चित्र आहे. हवेली बाजार समिती स्वतंत्र असताना समितीचे नाव ‘प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समिती’ असे होते. त्यानंतर हे नाव पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती असे झाले. या घटनेला एक वर्षाहून अधिक कालावधी उलटला, तरी अद्याप संकेतस्थळावर प्रादेशिक हे नाव आहे. बाजार समितीवर सुमारे दोन वर्षांपासून प्रशासक जाऊन प्रशासकीय मंडळाकडून कामकाज चालविले जात आहे. असे असतानाही अद्याप तत्कालीन प्रशासक दीपक तावरे हेच प्रशासक असल्याचे संकेतस्थळावर झळकत आहे. काही वर्षांपूर्वी समितीने शेतकरी, ग्राहकांना शेतमालाचे बाजारभाव, आवक कळावी यासाठी एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली होती; मात्र तीही बंद करण्यात आली आहे. तरीही त्याची माहिती संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे.
बाजार समितीचे संकेतस्थळ होईना अपडेट
By admin | Published: October 12, 2016 2:57 AM