पुणे - यूपीएससीच्या लोकसेवा परीक्षा २०२० चा निकाल जाहीर झाला आहे. एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. बिहारचा शुभम कुमार परीक्षेत पहिला आला आहे. आयआयटी मुंबईमधून त्यानं (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतली आहे. जागृती अवस्थी परीक्षेत दुसरी आली आहे. तिनं MANIT भोपाळमधून बीटेक (इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग) केलं आहे. युपीएससी परीक्षेचा निकाल लागला तेव्हा शुभम कुमार पुण्यात आहे. डिफेन्समध्ये सध्या प्रोबेशनरी अधिकारी असून ते पुण्यात प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट अमेरिकेतून पुण्यात फोन करुन शुभमचे अभिनंदन केले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत एकूण ७६१ जण उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या पहिल्या २५ जणांमध्ये १३ विद्यार्थी आणि १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर एकूण उत्तीर्ण उमेदवारांमधील विद्यार्थ्यांची संख्या ५४५, तर विद्यार्थिनींची संख्या २१६ इतकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मात्र, देशातील युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे त्यांनी ट्विटरवरुन कौतुक केलंय. विशेष म्हणजे युपीएससी टॉपर शुभम कुमार यांच्याशी थेट अमेरिकेतून फोन करुन संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट अमेरिकेतून शुभम कुमारला फोन केला. शुभमचे अभिनंदन करत, तुम्ही युपीएससी परीक्षा पास करुन देशातील तरुणांना प्रेरणा दिली. विशेषत: गाव-खेड्यातील तरुणांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे, तुमचा देशाला अभिमान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. शुभमला मोदींचा फोन आल्यानंतर त्याच्या मित्रांनीही शुभमचं कौतुक करत, अभिनंदन केले.
तिसऱ्या प्रयत्नात अव्वल स्थान
देशात पहिला आल्यानं अत्यंत आनंद झाल्याचं शुभम कुमारनं सांगितलं. शुभम बिहारच्या कटिहारचा रहिवासी आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यानं अव्वल क्रमांक मिळवला. याआधी त्यानं २०१८ आणि २०१९ मध्ये त्यानं परीक्षा दिली होती. २०१९ मध्ये तो देशात २९० वा आला होता. २४ वर्षांचा शुभम सध्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसमध्ये प्रशिक्षण घेत आहे. शुभमचे वडील ग्रामीण बँकेत व्यवस्थापक आहेत. त्याच्या कुटुंबात आई, वडील. बहिण, काका, काकींचा समावेश आहे.