पुणे : मी युपीएससीची परीक्षा पास होणारच! मी आयएएस होणारच! असं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ती झटली. ती लढली आणी ती जिंकली. आर्थिक परिस्थिती बेताची, दहावीनंतर लगेच लग्नासाठी आलेले स्थळ यावर मात करत ती आयएएस (IAS) झाली. हा प्रेरणादायी प्रवास आहे शामल भगत (Shamal Bhagat IAS) हिचा. पुणे जिल्ह्यातील शामल भगतने २०२३ च्या युपीएससीच्या निकालात (UPSC result 2023) २५८ वी रँक मिळवत यश मिळवले आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भगतवाडी गावातील शामलने युपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. तिचे वडील कल्याण भगत हे शेती आणि रंगकाम करण्याचा व्यवसाय करतात. लहानपणापासून घरी गरिबी असल्याने शामलचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. गावतल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शामल कल्याण भगत हिने युपीएससी परीक्षेत २५८ वी रँक मिळवत थेट आयएएस पदाला गवसणी घातली.
दुसऱ्या प्रयत्नात यश -
शामल ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. दहावीच्या परीक्षेतही तिने पहिला क्रमांक मिळवत यश प्राप्त केले होते. त्यानंतर बारावीपर्यंतचं शिक्षण सराटी गावातील जिजामाता विद्यालय येथे केले. बारावीतही तिने अभ्यास करून शाळेत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. त्यानंतर पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात बी.एसस्सी अॅग्रीची पदवी पूर्ण केली. येथे शिकताना तिने विद्यापीठाचं सुवर्ण पदकही पटकावले होते. याअगोदर दहावी झाल्यानंतर शामलला लगेचच तिच्या घरच्यांनी लग्नासाठी स्थळ आणलं होतं. पण त्याला विरोध करत शामलने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि आता IAS होऊन तो निर्णय कसा योग्य होता हे सर्वांना दाखवून दिले. UPSC च्या पहिल्या प्रयत्नात तिला पूर्व परीक्षेत यश आलं नाही. दुसऱ्यावेळी प्रचंड जिद्दीने अभ्यास करत तिने मेहनत घेतली. पहिल्या वेळी झालेल्या चुका दुसऱ्या वेळी होऊ दिल्या नाहीत. त्यानंतर तिने दुसऱ्या प्रयत्नात युपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली.
परीक्षाकाळात आईचे निधन-
मुलाखतीच्या तारखा जाहीर होण्यास काही दिवस बाकी असताना ८ नोव्हेंबर २०२३ रोजी तिच्या आईचं कर्करोगामुळं निधन झालं. आईच्या निधनामुळं तिला मोठा मानसिक धक्का बसला होता. अशा खडतर परिस्थितीतही ती डगमगली नाही. स्वत:ला सावरत मुलाखतीसाठी तिनं एकटीनं दिल्ली गाठली आणि १० जानेवारीला मुलाखतीचा अवघड टप्पाही पार केला. अखेर प्रतिष्ठेची समजली जाणारी आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होत तिनं आईनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत तिला खरी श्रद्धांजली वाहिली.
अखेर २०२३ चा यूपीएससीचा निकाल लागला आणि शामल देशात २५८ वी रँक मिळवत पास झाली. तिने आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, आपल्या गावाचं नाव देशभरात पोहोचवलं. शामलच्या या यशात तिच्या कुटुंबीयांचा, भावंडांचा मोठा हातभार आहे, असं तिने सांगितले. कोणताही क्लास न लावता तिने यूपीएससीची तयारी केली होती.