पुणे : एक लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेची वैद्यकीय उपचारासाठी मदत देणारी, शहरी गरीब योजना शहरातील सर्व खासगी रुग्णालयात कायम सुरू ठेवण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
याबाबत समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शहरातील काही रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजना (आयुष्यमान भारत) या दोन्ही योजना लागू असल्याने, काही खासगी रुग्णालयात शहरी गरीब योजना बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र अनेक नगरसेवकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रुग्णालयात ही योजना सुरू ठेवण्याची मागणी सभासदांनी केली होती. त्याला बुधवारी झालेल्या बैठकीत स्थायी समितीने मान्यता दिली.
------
मिळकतधारकांना न वगळण्याच्या सूचना
शहरी गरीब योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये खरोखरच १ लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असलेले आहेत का? याचा शोध घेण्यासाठी सदर लाभार्थी यादीत किती मिळकतकरधारक व सदनिकाधारक आहेत, याची चौकशी करणाच्या नोटिसा प्रशासनाने सुमारे सातशे जणांना पाठवल्या होत्या.
परंतु, लाभार्थी मिळकतकरधारक किंवा सदनिकाधारक नसावा अशी कुठलीच अट या योजनेच्या नियमावलीत नव्हती. तसेच या लाभार्थ्यांचे उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असेलच असेही होत नाही़ शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त, विधवा महिला, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे मिळकतकरधारक आहे म्हणून या लाभार्थ्यांना योजनेतून वगळता येणार नाही, अशा सूचना स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आल्याचे रासने यांनी सांगितले आहे़