पुणे : सामना पाणी योजना, जुन्या इमारतीयांचा पुनर्विकास युवकांसाठी खुली मैदाने अशा अनेक सुविधांवर भर देणार असल्याचे कोथरूडच्या उमेदवारांनी सांगितले आहे. महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्याशी लोकमतने संवाद साधला. शहरीकरणाच्या तुलनेत नागरी सुविधा वाढवण्यावर भर दिला जाईल असंही उमेदवारांनी सांगितले.
नवी बांधकामे, नवी व्यापारी केंद्र उभारणार
कोथरूडचे वेगाने शहरीकरण होत आहे, मात्र त्या तुलनेत विकासाच्या व त्यातही प्रामुख्याने नागरी सुविधांच्या वाढीचा वेग कमी आहे. त्याला गती देणे मला अतिशय महत्त्वाचे वाटते. त्याच उद्देशाने मी काही विचार केला आहे आणि त्यानुसारच पुढील काम करणार आहे. नवी बांधकामे, नवी व्यापारी केंद्र किंवा अन्य काही, ही कामे पर्यावरणपूरक अशीच होतील याची काळजी घेणे, मेट्रोचा विस्तार करणे, युवकांना नवे काही सुरू करायचे असते, मात्र त्यासाठी जागाच नसते. ही अडचण राहणार नाही, बऱ्यापैकी जागा उपलब्ध होईल याची काळजी घेण्यात येईल. याशिवाय समान पाणी योजना व अशाच काही मोठ्या योजना, ज्यांची कामे मागील ५ वर्षात सुरू झाली ती पूर्ण करून घेण्यात येईल. पाषाण तलाव ही कोथरूड मतदारसंघासाठी मोठीच उपलब्धी आहे. या तलावाचा तेथील जैवविविधतेला कसलाही धक्का लागणार नाही याची काळजी घेत विकास केला जाईल. तिथले पक्षीनिरीक्षण केंद्र तसेच अन्य गोष्टी पर्यटक आकर्षक होतील, अशा पद्धतीने करणे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. - चंद्रकांत पाटील, महायुती
दहशतमुक्त कोथरूडकडे विशेष लक्ष देणार
कोथरूडमधील स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ व्यक्ती आणि नागरिकांना विश्वासात घेऊन कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा कृती आराखडा (ब्लू प्रिंट) प्रत्यक्षात आणणार आहे. जुन्या इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्टीमुक्त मतदारसंघ, प्रत्येक झोपडीधारकाला हक्काचे घर या कामांना प्राधान्य असेल. युवकांना रोजगारनिर्मिती व स्टार्ट अप सुविधा, क्रीडापटूंसाठी क्रीडा संकुल व सुसज्ज मैदान, सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी ‘ससून’सारखे मोठे सार्वजनिक रुग्णालय तयार करू. कोथरूडचे वाहतूक नियोजन करण्यासाठी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, स्काय वॉक तयार करणार, आरक्षित भूखंडांचा वापर फक्त सार्वजनिक हितासाठीच होईल. बाणेर बालेवाडीत जैवविविधता उद्यानाची निर्मिती, दहशतमुक्त कोथरूडकडे विशेष लक्ष दिले जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा केंद्र असेल, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देऊ, गुलटेकडी मार्केट यार्डप्रमाणे कोथरूडमध्ये मोठी भाजीमंडई तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोथरूड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी व्हावी, यासाठी कल्चरल सेंटरची निर्मिती करण्याकडे लक्ष दिले जाईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोथरूडचा कचरा डेपो कायमचा हलवून त्या भूखंडावर शिवसृष्टी उभी करण्याचा माझा प्रयत्न असेल. कोथरूड हा आदर्श विधानसभा मतदारसंघ व्हावा, याला माझे प्राधान्य असणार आहे. - किशोर शिंदे, मनसे
युवकांना खेळ, व्यायाम यासाठी मैदानाची सुविधा
कोथरूडची एकूण वाढ लक्षात घेऊन ससूनप्रमाणेच येथे ८०० खाटाचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज सरकारी रुग्णालय २०१३-१४ ला मान्य झाले होते. तो विषय नंतर मागेच पडला. मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे, याचे कारण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कोथरूड, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कर्वेनगर, पौड रस्ता आणि अन्य काही भागांत युवकांना खेळ, व्यायाम यासाठी मैदानाची आवश्यकता आहे. कोणीही यावर विचार करत नाही. खुली मैदाने उभारण्यावर माझा भर असेल. ६ मीटर रस्त्यावर री-डेव्हलपमेंटसाठी टीडीआर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडणार नाही याची काळजी घेणार आहे. टेकड्या हरित राहाव्यात, शहराची हवा चांगली राहावी यासाठी बीडीपीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, ग्रीन टीडीआरसाठी १०० टक्के प्रयत्न करणार. मतदारसंघात आरक्षित भूखंड आहेत. तिथे गणेश कला क्रीडा मंचसारखे भव्य सभागृह बांधण्याचा माझा प्रयत्न असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक संघटना कोथरूडमध्ये आहेत. त्यांचा एक एकत्रित संघ स्थापन केला तर त्यांच्या गरजा, त्यासाठी काम करणे सोपे होईल. मेट्रो हा आता शहराअंतर्गत प्रवासासाठी अतिशय स्वस्त व तरीही आरामदायी असा पर्याय आहे. त्यामुळे मेट्रोचे जाळे कसे विस्तारता येईल यावर मी भर देईल. मी कोथरूडचा मूळ रहिवासी आहे, इथल्या समस्यांची मला जाण आहे. त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. - चंद्रकांत मोकाटे, शिवसेना