मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; अजित पवारांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 01:35 PM2024-09-24T13:35:37+5:302024-09-24T13:35:53+5:30

पोलीस विभागाने मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीस गर्डर टाकणे व इतर कामांसाठी सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी चोवीस तास काम करण्याची परवानगी द्यावी

urgently repair roads damaged by metro works; Ajit Pawar's instructions | मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; अजित पवारांचे निर्देश

मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; अजित पवारांचे निर्देश

पुणे : शहरातील माण हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी व इतर शासकीय सुट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलिसांनी चोवीस तास परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, अशा सूचना पवार यांनी केल्या. तसेच मेट्रो लाइन तीनच्या कामाची पाहणीसाठी येत्या २६ सप्टेंबरला भेट देणार असल्याचेही ते म्हणाले.

माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सोमवारी (दि. २३) आढावा घेतला. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, पोलिस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर तसेच पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मेट्रो लाइन तीनच्या कामात येणाऱ्या अडथळ्यासंदर्भात माहिती घेऊन पवार म्हणाले की, मेट्रोच्या कामांमुळे रस्ते खराब झाल्यास, ड्रेनेज लाइन खराब झाल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. मेट्रोचे काम व त्याखालील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मेट्रोचे काम करताना त्याखालील रस्ते, ड्रेनेज लाइनची कामे तातडीने करण्यात यावीत. ही कामे वेळेत होत नसल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येईल. बाणेर रॅम्प व पाषाण रॅम्पची कामे गतीने होण्यासाठी पोलिस विभागाने मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीस गर्डर टाकणे व इतर कामांसाठी सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी चोवीस तास काम करण्याची परवानगी द्यावी. वाहतूक वळविण्यात येणारे रस्ते सुस्थितीत असतील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असेही अजित पवार यांनी सूचित केले.

Web Title: urgently repair roads damaged by metro works; Ajit Pawar's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.