उरळी देवाची, फुरसुंगी नवीन नगरपालिका; राजकीय ऑपरेशनचा राष्ट्रवादीला फटका?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:12 AM2022-12-08T09:12:37+5:302022-12-08T09:14:14+5:30
या निर्णयाचा बाळासाहेंबाची शिवसेना या पक्षाला फायदा होण्याची शक्यता....
पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाची नवीन नगरपालिका करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय ऑपरेशन केले आहे. ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळल्याने राष्ट्रवादीला फटका बसणार आहे. या निर्णयाचा बाळासाहेंबाची शिवसेना या पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेत २०१७ साली ११ गावे आणि त्यांनतर २३ गावांचा समावेश केला गेला. पालिकेच्या गेल्या निवडणुकीत उपनगरांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. नगरपालिका घाेषित झालेल्या गावात राष्ट्रवादीचे गणेश ढोरे हे नगरसेवक होते. महापालिकेच्या आगामी प्रभागरचनेत या गावामध्ये नगरसेवकांची संख्या वाढली असती. राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त निवडून आले असते. त्याला ब्रेक लावण्यासाठीच भाजप आणि बाळासाहेंबाची शिवसेना यांनी रणनीती तयार करत वरील दोन्ही गावे महापालिकेतून वगळून नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचा राजकीय फायदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपला होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी या निर्णयासाठी गेले काही महिन्यांपासून प्रयत्नशील होते. नगरपालिका झाल्यामुळे येथील वॉर्ड लहान होणार आहेत. लहान वॉर्ड असल्याचा फायदा बाळासाहेंबाची शिवसेना अर्थात विजय शिवतारे यांना अप्रत्यक्षरीत्या होणार आहे.
निर्णय डोकेदुखीचा ठरणार
दाेन गावांची नगरपालिका करण्याच्या या निर्णयामुळे पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अन्य गावांमधूनदेखील स्वतंत्र नगरपालिकेची मागणी जाेर धरेल. त्याचबरोबर राज्यातील अन्य पालिकांमध्ये समाविष्ट झालेल्या गावामधून अशा प्रकारांची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारला हा निर्णय डोकेदुखीचा ठरणार आहे.
दोन गावांचाच पुळका
भाजपचेच सरकार राज्यात असताना उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन हद्दीलगतीची गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. आता उरुळी देवाची, फुरसुंगी या गावांना महापालिकेतून वगळल्याने हा न्यायालयाचा अवमान आहे. राजकारण करण्यासाठी केवळ या दोन गावांचा पुळका का, अशी टीका हवेली तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी केली.