गावांचा नियोजनबद्ध विकास आणि स्थानिकांचा फायदा
पुणे - महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर महामार्गावरील उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांच्या शिस्तबद्ध विकासासाठीचा नगर नियोजन आराखडा (टीपी स्कीम) प्रगतिपथावर आहे. तीस वर्षांच्या खंडानंतर पुण्यात टीपी स्कीम राबविली जात आहे.महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांपैकी या दोन गावांमध्ये नगर नियोजन आराखड्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच समाविष्ट इतर गावांमध्येही अशा प्रकारे नियोजनबद्ध विकास करणाऱ्यावर महानगरपालिकेचा भर असणार आहे.
मार्च २०१९ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या दोन गावांमध्ये मिळून तीन नगर नियोजन आराखड्यांना मंजुरी मिळालेली आहे. त्यानुसार उरुळी देवाची येथील ११० हेक्टर जागेवर आणि फुरसुंगी येथील पहिली २६२ आणि दुसरी २७८ हेक्टर अशाएकूण५४० हेक्टर जागेवर नगर नियोजन आराखडा राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील कच्च्या मसुद्यावर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केलेली आहे. उरुळी देवाची येथील होळकरवाडी ते वडकी दरम्यानच्या जागा, तसेच फुरसुंगी येथील वडकी गाव ते कदमवाक वस्ती दरम्यान नगर नियोजन आराखडा राबविण्यात येणार आहे.नागरिकांच्या हरकतींसह या नगर नियोजन आराखड्याचा कच्चा मसुदा जुलै २०२१ पर्यंत प्रत्यक्षात येईल, असे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याचा स्थानिक ग्रामस्थांना फायदा होणार असून, त्याबरोबरच परिसराचा आखीवरेखीव विकास होण्यास मोठा हातभार लागणार आहे.
१९८९नंतर प्रथमच पुण्यात नगर नियोजन आराखड्याची योजना राबविण्यात येत आहे.नगर नियोजन आराखड्याचा इतिहास पाहिला, तर पुण्यातील पहिला नगर नियोजन आराखडा १९३१ मध्ये भांबुर्डा (शिवाजीनगर) येथे राबविण्यात आला. त्यातून जंगली महाराज रस्ता, ना. गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (एफसी रोड), प्रभात रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी उद्यान परिसराचा अतिशय नियोजनबद्ध विकास झाला. त्यानंतर सोमवार पेठ, मंगळवार पेठ, अन्य उपनगरे, संगमवाडी, येरवडा, पर्वती, शंकरशेठ रस्ता अशा आठनगर नियोजन आरखड्याच्या अंमलबजावणीतून संबंधित परिसराचा शिस्तबद्ध विकास होण्यास हातभार लागला.
--
कोट -
अहमदाबाद आणि सुरत महानगरपालिका हद्दीत टीपी स्कीमसाठी स्वीकारण्यात आलेले लवचीक धोरण महाराष्ट्रातही अमलात आणावे, यासाठीची आग्रही भूमिकादेवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत घेतली गेली. त्यानंतर महाराष्ट्र रीजनल अँड टाऊन प्लॅनिंग अॅक्टमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केल्याने नगर नियोजन आराखड्यांचे काम मार्गी लावण्यात मदत होत आहे. गेल्या ४० वर्षांत पुण्यातील लोकसंख्या दर दहा वर्षांनी दुप्पट होत गेली. मात्र नियोजनबद्ध नागरीकरणाचा वेग त्या तुलनेत वाढला नाही,त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या नगर नियोजन योजना शिस्तबद्ध नागरीकरणाला वेग देतील आणि त्यातून त्याचे महत्त्वही नव्याने अधोरेखित होणार आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेता
--
चौकट -
नगर नियोजन आराखड्याची वैशिष्ट्ये
प्रत्येक जागामालकाला जमिनीच्या स्वरूपात योग्य मोबदला मिळणार
रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था इत्यादींसह मूलभूत सुविधा विकसित केल्या जाणार
इतर अत्यावश्यक व समाजोपयोगी आरक्षणे ठेवली जाणार