उरुळी कांचन : येथील परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४९ बाधित आढळले असून २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ दुकानांवर पोलिसांनी कारवाई करून नऊ हजारांचा दंड वसूल केला आहे.
राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, या आदेशामध्ये स्पष्टता नसल्याने अनेक जण किरकोळ कारण सांगून संचार करत असताना दिसत आहे. त्यामुळे उरुळी कांचन पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दुकानदार, भाजीवाले, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला. मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदा पाचशे रुपये, तर दुसऱ्यांना मास्क न घातल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्याचबरोबर तरी दि. १६ एप्रिल २०२१ पासून उरुळी कांचनमधील सर्व व्यवहार दुपारी २ वाजता बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी दिली. यामधून अत्यावश्यक सेवांना पण सवलत नाही (मेडिकल व हॉस्पिटल सोडून) असेही त्यांनी सांगितले. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकृत अहवालानुसार आजपर्यंत १७६६ जणांना कोरोनाची लागण झाली. पैकी १५७९ बरे होऊन घरी गेले असून सध्या १५१ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत, तर आजअखेर ३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली.
आकडेवारीचा घोळ
राज्य सरकारने वाढत्या कोरोनाची साखळी तुटण्यासाठी पंधरा दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. परंतु उरुळी कांचन शहरात फारसा परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. रस्ते तर गर्दीने भरून वाहत आहेत. तर कोरोना रुग्णांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे, चोवीस तासांत ७ जणांना मृत्यूने गाठले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे एका वयस्कर महिलेचा मृत्यू रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड न मिळाल्याने झाला आहे. मात्र अधिकृत आकडेवारी व प्रत्यक्षात असणारे रुग्ण आणि झालेले मृत्यू याचा ताळमेळ बसत नसल्याने खासगी रुग्णालये आपल्याकडील माहिती शासनाच्या अधिकाऱ्यांना देत नसल्याचे उघड होत असतानाही त्यांचेवर कारवाई होत नाही याचे नेमके कारण काय? असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.