शहरात आरोग्य विभागाकडून ॲक्टिव रुग्णांचा आकडा २८ रुग्ण असा सांगितला जात असला, तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच असून शहरात चालू स्थितीत रुग्णांचा आकडा ६० पेक्षा अधिक असल्याची भीती व्यक्त होत आहे.
पुणे शहरात कोरोनाची संख्या वाढत असताना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उरुळी कांचन शहरात रुग्णांची संख्या आरोग्य विभाग प्रतिदिन २ ते ३ रुग्ण आढळत असल्याची पुष्टी देत होता. मात्र, मंगळवारी अचानक कोरोना रुग्णांची संख्या १० इतकी आढळल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने ही वाढ गांभीर्याने घेतली आहे. सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी तातडीने ग्रामपंचायतीची बैठक घेऊन या ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करतानाच नियमांचे पालन न करणारांवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायत गुरुवारी ( दि.४) रोजी शहरात नागरिकांत जनजागृती निर्माण व्हावी म्हणून "कोरोना जनजागृती फेरी" काढणार आहे. शहरात येणाऱ्या रस्त्यांवर जाणाऱ्या येणाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तर शहरात आढळून येणाऱ्या रुग्णांचा ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून उपाय योजना करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत मास्क व सुरक्षिततेच्या अन्य नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे या ठिकाणी शासनाचे नियम तोडून गर्दी जमविल्यास फौजदारी कारवाईचा इशारा सरपंच संतोष कांचन यांनी दिला आहे.
बैठकीला जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन , उपसरपंच संचिता कांचन , ग्रा.प.सदस्य मिलिंद जगताप, अमित कांचन , मयूर कांचन , शंकर बडेकर , ग्रा.प. सदस्या अनिता तुपे, सीमा कांचन, स्वप्नीशा कांचन, प्रियंका पाटेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सहा गावांच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच पोलीस, महसूल विभाग यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन यांनी मार्गदर्शन केले, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, डॉ.सुचिता कदम,डॉ. संदीप सोनवणे, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस,पोलीस उप निरीक्षक सदाशिव गायकवाड, दत्ता जांभळे, रामलिंग भोसले आदींनी उपाय योजनांवर चर्चा केली.