--
उरुळी कांचन : उरुळी कांचन गावातील दैनंदिन वाहतूक व्यवस्था पूर्ण बेशिस्त झाली असून त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष नसल्याने जनता त्रस्त झाली असून वाहतुकीची दुरावस्था या गावातील सर्वसामान्य नागरिकाची डोकेदुखी झाली आहे यावर नेमका तोडगा काढून यातून जनतेला दिलासा देणारी कोणतीच योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून वा या भागाचे आमदार, खासदार या वरिष्ठ लोकप्रतिनिधिकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे.
साध्या साध्या कामासाठी दुचाकीस्वाराला देखील अर्धा ते पाऊन तास रस्त्यात घालवावा लागत आहे. सध्या उरुळी कांचन गावाच्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया चालू असून या ठिकाणी २० ऑगस्ट पासून प्रशासक राज आहे, पंचायत समिती हवेलीचे विस्तार अधिकारी निकेतन धापटे व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस हे सध्या कारभारी आहेत, हे दोघेही नवीन असल्याने ते कार्यकारी मंडळ निवडून येण्याची वाट बघत या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा ठपका सर्वसामान्य नागरिकांनी ठेवला आहे. उरुळी कांचनच्या भौतिक गरजांसाठी जनतेने निवडून दिलेल्या सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी एकत्र येवून सर्वांगीण विकास आराखडा तयार करून जनतेला दिलासा देण्याचे काम करणे अपेक्षित असताना ते गेल्या १५ ते २० वर्षाच्या काळात होत नाही अशी खंत नागरिक बोलून दाखवीत आहेत.
सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो ज्याने गावाचे दोन भागात विभाजन केले आहे, तसेच मुंबई - पुणे या ठिकाणाहून दौंड, सोलापूर,हैदराबादच्या बाजूला जाणाऱ्या रेल्वे गाड्या उरुळी स्टेशनवरून जातात या लोहमार्गानेही गावाच्या हद्दीचे विभाजन झाले आहे, अशा प्रकारे दोन महत्वाच्या दळणवळण मार्गाच्या गावठाण हद्दीतून जाण्याने गावाचे तीन तुकडे झाले आहेत यावरून होणारी मोठ्या वाहनांची वाहतूक व वाढलेल्या नागरीकरणाने या ठिकाणी असलेल्या कामगार, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी वर्ग यांच्या दुचाकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर आदी वाहनांची दररोजची वाढणारी संख्या यामुळे असलेले रस्ते हा वाहतुकीचा भार पेलण्यासाठी अकार्यक्षम ठरत आहेत.
--
चौकट
ट्राफिक जामसाठी अतक्रिमण प्रमुख कारण
सेवा रस्त्यावरील टपऱ्यांचे, हातगाड्यांचे अतिक्रमण तसेच रस्त्यांवरील, ओढ्यावरील व सार्वजनिक जागांवरील वाढणारे अतिक्रमण पोलिसांच्या मदतीने काढण्या कडे होणारे दुर्लक्ष गावातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहे. त्याकडे जाणीव पूर्वक केले जाणारे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे, या कोंडीतून रुग्णवाहीकाही सुटत नाही. याला पर्याय देत बेशिस्त मोडीत काढून वाहतुकीला शिस्त लावणे अत्यंत गरजेचे झाले असताना ग्रामपंचायत प्रशासन ठप्प का? असा प्रश्न जनतेला सतावत आहे.
--
फोटो : ०२ उरुळी कांचन वाहतुक कोंडी
फोटो ओळ : तळवाडी चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.