-------------------------------
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे वाहतूक कोंडीचा दररोज स्थानिकांना त्रास होत असून, वाहतूक पोलीस मात्र त्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत असल्याने व पावत्या फाडण्यात व तडजोड करण्यात मश्गुल असल्याने व वाहतूक सुरळीत कोणी करायची, हा प्रश्न निरुत्तरीत आहे.
पुणे - सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना ती सुरळीत करणे बाजूला ठेवून शहर वाहतूक पोलीस गिऱ्हाईक शोधून अर्थपूर्ण तोडगा काढण्याला प्राधान्य देत असल्याची तक्रार सर्वसामान्य जनता व स्थानिक नेते करीत आहेत. याबाबत या पोलिसांच्या वरिष्ठांकडे अनेक वेळा तक्रार करून अद्याप त्यात काहीच फरक पडला नाही. आज चक्क रुग्णवाहिका या कोंडीत अडकून सुमारे अर्धा तास रखडण्याची घटना घडली आहे.
पुणे शहर पोलीस तासन्तास महामार्ग तुंबून वाहतूक कोंडीची घुसमट रोखण्यास अपयशी ठरल्याने या महामार्गावर वाहतुकीचा सातत्याने बोजवारा उडत आहे. सोलापूर महामार्गावरील १५ नंबर, शेवाळेवाडी, , कवडीपाट, लोणीस्टेशन, थेऊर फाटा, उरुळी कांचन तसेच सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची, फुरसुंगी फाटा, मंतरवाडी, वडकीपर्यंतच्या वाहतुकीला या बेशिस्तीचा प्रचंड अडसर निर्माण होत आहे. परिणामी, चारपदरी असलेला सोलापूर महामार्ग व पालखीमार्ग असलेला सासवड रस्ता वाहतुकीला हे दोन्हीही रस्ते तोकडे पडू लागले आहेत. तासन्तास हा रस्ता वाहतुकीने जाम होत असल्याने काही मिनिटांचा प्रवास तासांचा बनला आहे. उरुळी कांचन पर्यंतची हद्द शहर पोलिसांकडे; परंतु या नित्याच्या वाहतूक कोंडीवर वाहतूक पोलिसांना अजूनही मार्ग निघाला नाही.
---
वाहतूक कोंडी होत आहे ही वस्तुस्थिती आहे. आम्ही यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहोत व जे कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही.
उत्तम चक्रे
पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे
---
फोटो क्रमांक : २४उरुळी कांचन येथे वाहतूक कोंडी
फोटो ओळ : उरुळी कांचन येथे रोजच होते वाहतूक कोंडी. त्याचा त्रास स्थानिक जनतेला होतोय.