लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर/ उरुळी कांचन : जिल्ह्यात शनिवारी पोलिसांनी मटका व्यावसायिकांना चांगलाच हिसका दाखवला. उरुळी कांचन, उरुळी देवाची, तसेच कोरेगाव भीमा येथील व्यावसायिकांवर धाड टाकत लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा व युनिट ६ च्या पथकाने ही कारवाई केली. तीन पत्त्याच्या खेळाचा क्लब व मटक्याच्या धंद्यावर छापा मारून एकूण ७२ जनांना ताब्यात घेतले आहे. यात राजकीय कार्यकर्त्यांबरोबर माननियांचाही समावेश आहे. ग्रामीण भागातील आजवरची ही सर्वांत मोठी कारवाई समजली जाते.
उरुळी कांचन येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या हॉटेल गारवानजीक खेडेकर मळा येथे संजय बडेकर याने जुगार अड्डा सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली होती. याची शहनिशा करण्यासाठी उपायुक्त श्रीनिवास घाडगे हे पथकाबरोबर मध्यरात्री घटनास्थळी गेले. त्याठिकाणी रम्मीचा खेळ सुरू होता. येथे कारवाई करून अड्डा चालवणारे बडेकर याच्यासमवेत अनिल कांचन, अतुल ऊर्फ आप्पा कांचन व योगेश ऊर्फ बाळा कांचन या भागीदारासह ६० जणांना ताब्यात घेतले. यात १५ कामगारांचा समावेश आहे. खेळणारांमध्ये उरुळी कांचन येथील माजी उपसरपंच, सदस्य, विद्यमान सदस्याचा पती व यात्रा कमिटी सदस्यांसमवेत पुणे शहर व उपनगर तसेच पिंपरी-चिंचवडसह हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश आहे.
दुसरीकडे युनिट ६ च्या पथकाने उरुळी देवाची येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीत जयराम ट्रान्सपोर्टच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमीलगत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. मटकाचालक मंगेश कुलकर्णी याचेसह १३ जणांना त्यांनी अटक केली. या दोन्ही कारवाया एका गावात व एकाच वेळी झाल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
चौकट
पत्त्याच्या क्लबवर टाकलेेेल्या छाप्यात ६० जणांवर कारवाई करून १ लाख ४४ हजार २१० रुपये रोख रकमेसह १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी व जुगार खेळण्याची साधने जप्त करण्यात आली आहेत. तर युनिट ६ ने मटक्यावर घातलेल्या छाप्यात १२ जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी ९२ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
-----
कोरेगाव भीमात मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मटका अड्ड्यावर छापा टाकत मटका खेळणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेत कारवाई केली. या कारवाईत २० हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल व तीन दुचाकी, मोबाईल असा एक लाख चार हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. या कोरेगाव भीमातील कारवाईनंतर इतर गावांतही चालू असणाऱ्या अवैध धंद्यांच्या मुसक्या पोलीस आवळणार असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा येथील आदित्य पार्क येथील एका बंद खोलीत काही इसम मटका खेळत असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळाली. त्यांनतर पोलिसांनी पथकाने सदर ठिकाणी जात छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी काहीजण मटका खेळत असल्याचे दिसले. शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने तेथील व्यक्तींना ताब्यात घेत तेथील मटका खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यदेखील जप्त केले. यात शिक्रापूर पोलिसांनी सचिन विश्वंभर करमुडे, अनिल बाबूराव भांडवलकर, भरत वैजनाथ राऊत, सचिन सुधाकर जगताप, बाळू राजाराम चौधरी, सहदेव महादेव डोंगरे, शहाजी बाबूराव गव्हाणे, संतोष रमेश रजपूत, अशोक बाळासाहेब ढेरंगे (सर्व रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले. या कारवाईत वीस हजार तीनशे रुपयांसह तीन दुचाकी, मोबाईल असा एक लाख चार हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.