उरुळी कांचन या गावाला गेल्या १५ वर्षांपासून प्रगल्भ तथा जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार दरबारी वजन असणारे नेतृत्व ग्रामपंचायतीत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा, कचरा निर्मूलनाचा, वाहतूक कोंडीचा, आरोग्याच्या सुविधांचा, गावातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीचा, महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांचा, ग्रामसचिवालय इमारतीचा तसेच रस्ते, ओढे व मोकळ्या सार्वजनिक जागांवर होणारे अतिक्रमण काढण्याचा. असे अनेक प्रश्न आ वासून समोर उभे असताना ते सोडवण्यासाठी कोणताही आराखडा आखताना व विकासाची दिशा देणारे काम होत नसताना नेमके ग्रामपंचायत सदस्य का व्हायचे, हे कोडे उलगडत नाही अशी जाणकारांमध्ये चर्चा आहे.
या पूर्वीचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी या निवडणुकीत एकत्र झाल्याने गटाचे आणि नेतृत्वाचे अस्तित्व कोठेही दिसत नाही. असे वास्तव चित्र आज तरी उरुळी कांचन ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान दिसत आहे, जिल्ह्यात आपल्या मनमानी व दिशाहीन कारभाराने नेहमीच राजकीय व सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व दलीय तालेवार उमेदवारांनी फक्त ग्रामपंचायतीत निवडून जाण्यासाठी वार्डा - वार्डात हातमिळवणी केल्याने मतदार चांगलेच चक्रावून गेले आहेत, तर स्थानिक राजकीय रंगमंच सतत बदलत्या भूमिकेने हलता ठेवण्याच्या प्रवृत्तीने गटांचे , स्थानिक नेतृत्वाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे फ्लेक्सवरील फोटोवरून जाणवू लागल्याची चर्चा चौका चौकात रंगात आली आहे.
प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र भूमिका, आघाडी... युती.....गुप्त आणाभाका.. घेऊनही त्या न पाळता एकाला चलो रे चा नारा देत समोरच्याला कसा अडचणीत आणायचा हे निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे तंत्र सर्वसामान्य मतदाराला बुचकाळ्यात टाकत असल्याने येत्या १८ तारखेला काय निकाल लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
. काही मतदार व जाणकार म्हणतात ''''परग्रहावरील तारे मोजता येतील''''पण उरुळी कांचनच्या स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांंचा व कार्यकर्त्यांचा अंदाज बांधणे महाकठीण झाले असल्याचा प्रत्यय चालू निवडणुकीत येताना दिसत आहे.
समस्यांच्या गर्तेत असलेल्या या मोठ्या लोकसंख्येच्या शहराला सशक्त नेतृत्वाचा पर्याय मिळेल म्हणून जनता या निवडणुकीकडे अपेक्षेने पाहत आहे, मात्र निवडणूकीत मतदारांना शह काटशहाचं राजकारण करणाऱ्या मंडळींच्या अनोख्या पध्दतीने एकत्र येऊन संधिसाधूपणाचे राजकारण पहाण्याची वेळ जनतेवर येवून ठेपली आहे.