उरुळी कांचन: कोरोना संसर्गाच्या महामारीपासून सर्वसामान्य जनतेला वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज उरुळी कांचन परिसरातील खासगी हॉस्पिटलला आमदार अशोक पवार यांनी तीन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट दिले आहेत. रुग्णालयाने याचा वापर गोरगरीब जनतेसाठी करण्यात यावा. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. सद्यस्थितीत ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्याला पर्याय म्हणून हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन तो रुग्णाला पाच लिटर ताशी क्षमतेनेे पुरवठा करता येणारे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मिळवण्यात आले आहे. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या सी.एस.आर फंडातून त्याचे वितरण जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांना करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून आज उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलला आमदार अशोक पवार यांच्या हस्ते २ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर व लोणी काळभोर येथील सुयश हॉस्पिटलला एक ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देण्यात आला आहे. याप्रसंगी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर , शिरूरचे उपविभागीय अधिकारी सुभाषकुमार देशमुख, हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की, सध्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची सातत्याने कमतरता भासत असून प्रशासन ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल मागणीप्रमाणे मिळत नाही. तसेच ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लांटची क्षमता कमी असल्याने गरजेइतका ऑक्सिजन उत्पादन होत नाही. त्यामुळे उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनचे वाटप करताना प्रशासनाला नको इतका ताण घ्यावा लागत आहे, त्याला थोडा हातभार लावण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची आधुनिक उपकरणे भेट देऊन रुग्णालयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उरुळीत आमदाराकडून खासगी रुग्णालयाला सहकार्य, दिले ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 5:55 PM
सध्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता
ठळक मुद्देहातभार लावण्याच्या दृष्टीने दिली ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर सारखी आधुनिक उपकरणे