बारामती : बारामती येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पणन मंडळाने उभारलेल्या निर्यात केंद्रातील आंबे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पाठविण्यात आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर राज्यातील दर्जेदार आंबे सातासमुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहचल्याची आनंदाची बातमी ‘शेअर’ केली आहे.
सोशल मीडियावर खासदार सुळे यांनी केलेले कौतुक चर्चेचा विषय ठरले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पाठविण्यात येणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकुर आंब्याचा समावेश आहे. राज्यातील दर्जेदार आंबे सातासमुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहचल्याची अतिशय आनंदाची बाब आहे. रेनबो इंटरनॅशनलचे हार्दिक अभिनंदन, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्यातदारांचे अभिनंदन केले आहे.
या वर्षी रेनबो इंटरनॅशनल या संस्थेने जळोचीतून निर्यात केलेले आंबे थेट आता व्हाईट हाऊसमध्ये पोहोचणार आहेत. गुरुवारी अमेरिकेत वॉशिंग्टन या राजधानीत भारतीय आंबा प्रचार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये या आंब्यांची पेटी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडे सुपूर्द करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
रेनबो इंटरनेशनल संस्थेचे प्रमुख अभिजीत भसाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, २०१९ मध्ये आपण ३०० टन आंबे पाठविले होते. कोविड काळात अमेरीकेत आंबा निर्यात पूर्ण बंद होती. यावर्षी आजअखेर १०० टन आंबा पाठविण्यात आला आहे. विमानाचे इंधनदरवाढ झाल्याने विमानभाडे वाढ झाली आहे.परिणामी अमेरिकेत २५ डॉलरला मिळणार आंबा दुप्पट म्हणजेच ५० डॉलरवर पोहचला आहे.