कोथरूड : कोथरूड भागातील वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी महापालिकेने कोथरूड भागातील कॅनॉल रस्ता तयार केला. परंतु नव्या लोकप्रतिनिधी अन् अधिकाऱ्यांच्या दुभाजक बसवण्याच्या निर्णयाने कॅनॉल रस्त्याचा वापरच शून्य होण्याची भीती निर्माण झाली आहे. कोथरूड भागातील करिश्मा चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यासह वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून नियंत्रक दिवे बसवण्यात आले. या दिव्यांची कार्यवाही सुरू करण्यापेक्षा दुभाजक बसवून कॅनॉल रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोथरूड भागातील कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी एसएनडीटी महाविद्यालयापासून वारजेपर्यंत पर्यायी असलेल्या ६ किमीच्या रस्त्याची निर्मिती करण्यात आली असून, या रस्त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत. वारजे कर्वेनगर, कोथरूड भागांतील वाहनचालकांसाठी या रस्त्याचा वापर महत्त्वाचा असतानाही प्रशासन मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची दक्षता घेताना दिसत नाही. कोथरूडच्या मुख्य रस्त्याला पर्यायी असलेला कॅनॉल रस्ता करिश्मा चौकात बंदच करण्यात आल्याने या रस्त्याचा वापर करणाऱ्या निवडक चालकांनीही याकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले आहे. (वार्ताहर)
वाहतूक बदलाने कॅनॉल रस्त्याचा वापर शून्य
By admin | Published: June 30, 2015 12:34 AM