पुणे : राज्य कर विभागात निरीक्षक पदाची नोकरी मिळविण्यासाठी एकाने क्रीडापटू असल्याची बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी भारतीय तलवारबाजी महासंघाच्या माजी सचिवासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय तलवारबाजी महासंघाचे माजी सचिव अशोक दुधारे, तुषार वसंतराव चौधरी (रा. पाटकुले, ता़ मोहोळे, जि़ सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी क्रीडा आणि युवक सेवा विभागाच्या पुणे कार्यालयातील प्रभारी उपसंचालक विजय संतान यांनी येरवडा पोलिसांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य कर विभागात चौधरी निरीक्षक पदावरील नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होता. क्रीडापटूंसाठी आरक्षण असल्याने चौधरी तलवारबाजीत प्राविण्य मिळविल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न सुरु केले होते. भारतीय तलवारबाजी महासंघाचे माजी सचिव अशोक दुधारे यांना बनावट प्रमाणपत्र सादर केले. प्रमाणपत्राची शहानिशा न करता दुधारे याला प्रमाणपत्र दिले. चौधरी याने हे प्रमाणपत्र क्रीडा आणि युवक सेवा विभागाकडे सादर केले. त्याची पडताळणी करण्यात आली असता चौधरी राष्ट्रीय पातळीवरील तलवारबाजी संघात महाराष्ट्राकडून सहभागी झाला नसल्याचे उघडकीस आले. या स्पर्धेत मणीपूर संघाने सुवर्ण पदक मिळविले होते. मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश संघाने अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळविले होते. हे पडताळणीत उघड झाले. चौधरी याने बनावट कागदपत्रे सादर केली व या कागदपत्रांची पडताळणी न करता दुधारे यांनी प्रमाणपत्र तयार करुन दिल्याचे उघड झाल्याने क्रीडा विभागाने दोघांविरुद्ध नोकरी मिळविण्यासाठी शासनाची फसवणुक केल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर; तलवारबाजी महासंघाच्या माजी सचिवावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 10:52 PM
राज्य कर विभागात निरीक्षक पदाची नोकरी मिळविण्यासाठी क्रीडापटू असल्याची बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचा प्रकार
ठळक मुद्देयाप्रकरणी क्रीडा आणि युवक सेवा विभागाच्या पुणे कार्यालयातील प्रभारी उपसंचालकाची फिर्याद