पुणे : रेल्वे रुळांच्या सुरक्षेसाठी गस्त घालणाऱ्या पेट्रोलमॅनला जीपीएस प्रणाली देण्यात आली. त्यामुळे तो नेमक्या कोणत्या सेक्शनमध्ये आहे. तो खरंच रुळांची पाहणी करतोय का? आदी बाबतची माहिती लगेच संबंधित अधिकाऱ्यांना कळणार आहे. पुणे विभागात याचा वापर सुरू झाला असून, पुणे ते लोणावळा, पुणे-दौंड व पुणे ते मिरज सेक्शनमध्ये याद्वारे आता पेट्रोलमॅन गस्त घालीत आहेत. रुळांची सुरक्षा अधिक चांगली व्हावी हा यामागचा प्रमुख हेतू आहे.
पुणे विभागातील जवळपास ३०० पेट्रोलमॅन कर्मचाऱ्यांना हे उपकरण दिले आहे. त्यामुळे रुळावरची गस्त आता हायटेक झाली आहे.
गेल्या काही दिवसांत भारतीय रेल्वेत चांगले अत्याधुनिक बदल होत आहे. हा त्यातलाच एक भाग आहे. यामुळे प्रवासी गाड्या पर्यायाने प्रवासी सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे.
काही विभागात पेट्रोलमॅनने आपले दिलेले बिट पूर्ण न करणे किंवा त्यात हस्तक्षेप करणे आदी प्रकार घडल्याने रेल्वे प्रशासनाने पेट्रोलिंग करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
----------------------
बिटबुकचा वापर सुरूच राहणार :
पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बिटबुक दिलेले असते. आपले बिट पूर्ण करताना म्हणजेच दिलेल्या दोन स्थानकांदरम्यान गस्त घालताना मार्गात आपल्या विरुद्ध दिशेने चालत येणाऱ्या पेट्रोलमॅनकडे त्यांनी बुकची देवाण-घेवाण करून आपल्या दिलेल्या स्थानकावर जाऊन त्या स्टेशन मास्टर्सची सही व शिक्का घेणे गरजेचे असते. जरी आता जीपीएस प्रणाली दिली असली तरीही पेट्रोलमॅनला हे बिटबुकची प्रक्रिया पूर्ण करावी लागणारच आहे.