बारामती : बारामती तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडूक निकालानंतर विजयी उमेदवार यांची विनापरवाना विजयी रॅली काढली होती. यामध्ये जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करून विनापरवाना डी.जे.ची मिरवणुकीत वापर केल्याप्रकरणी मोरगाव येथील पाचजणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल तुषार शिवाजी जैनक यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक पोपट ऊर्फ कैलास सर्जेराव तावरे, माजी सरपंच नीलेश हरिभाऊ केदारी, नवनिर्वाचित सदस्य अक्षय यशवंत तावरे यांच्यासह सूरज प्रल्हाद तावरे व समीर कैलास जाधव (सर्व, रा. मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील पाचही आरोपी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या विजयी उमेदवार यांची विनापरवाना विजयी रॅली काढली. जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करून विनापरवाना डी.जे.चा मिरवणुकीत वापर करून व मयूरेश्वर मंदिरासमोर विनापरवाना भाषण केले. सभ्यता व नीतीमत्ता यास धोका पोहोचेल असे चिथावणीखोर भाषण करून त्यांना दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचा भंग केला. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास फौजदार वाघोले करीत आहेत .