पुणे : ‘स्वातंत्र्यलढ्यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आजची तरुणाई मात्र, अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या तालावर रमत आहे. सोशल मीडियाला अधिक वेळ देत आहे. तरुणांनी ग्रामविकास व कृषिविकासाचा झेंडा हाती घ्यावा. कारण राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणाईचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. तरुणांच्या हातात माहिती तंत्रज्ञानाचे मोठे जाळे आहे. त्याचा उपयोग सकारात्मक कामासाठी करायला हवा,’ असे मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.गणितज्ज्ञ डॉ. अच्युत शंकर आपटे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यार्थी सहायक समिती व उचित माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. ‘लोकसहभागातून ग्रामविकास’ या विषयावर पवार यांनी मार्गदर्शनकेले.समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन येथे झालेल्या या व्याख्यानावेळी विद्यार्थी सहायक समितीचे विश्वस्त व माजी पर्यवेक्षक रमाकांत तांबोळी, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील, विश्वस्त तुषार रंजनकर, माजी विद्यार्थी हरीश बुटले, चंद्रकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.गिरीश कुलकर्णी याने सूत्रसंचालन केले. ऋतुजा धावडे हिने आभार मानले.हिवरेबाजारात नाहीत महापुरुषांचे पुतळेपवार म्हणाले, ‘हिवरेबाजारमध्ये कोणत्याही महापुरुषांचे पुतळे उभारलेले नाहीत की जयंतीही साजरी केली जात नाही. त्यांचे विचार प्रत्यक्ष अमलात आणले जातात. वाढते शहरीकरण व अधिक उत्पादनाच्या नावाखाली शेतीवर होत असलेले अघोरी उपाय पाहता, आजारांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी आता तरुणांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन केले, तर दुष्काळाशीही दोन हात करता येऊ शकतात.‘विद्यार्थ्यांनी पाण्याचा ताळेबंद शिकावा. पावसाचे पाणी अडवून ते जिरवण्याचा उपक्रम राबवला पाहिजे. पाण्याचा ताळेबंद मांडल्यानेच हिवरे बाजारचे दरडोई उत्पन्न वाढले आहे. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला, असे सांगितले. मात्र सध्या खेड्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. हे थांबवण्यासाठी तरुणांनी खेड्यातील उपलब्ध साधनांचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यावा.’
चांगल्या कामासाठी तंत्रज्ञान वापरा - पोपटराव पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 2:20 AM