पुणे : गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, अशी सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत केली.गृहमंत्री देशमुख शनिवारी पुणे भेटीवर आले होते.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त बच्चनसिंह, मितेश घट्टे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, कायदा सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे काम पोलिसांना करावे लागते. गुन्हेगारांवर वचक बसविणे तसेच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होईल. तसेच गुन्हेगारांना वचक बसेल.यावेळी पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी शहरातून तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार पुन्हा शहरात आल्यास त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एक्स्ट्रा अॅप (ट्रॅकिंग आॅफ एक्सट्रनी)ची माहिती दिली.या अँपचे माध्यमातून आतापर्यंत २० तडीपार आरोपी यांचेवर निगराणी ठेवण्यात येत आहे. तसेच या अँपचे माध्यमातून निगराणी ठेवण्यात येत असताना त्याचा तडीपार आदेशाचा भंग करणाऱ्य आरोपीला न्यायालयाने ४ महिने कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘स्मार्ट पोलिसिंग’ योजनेची माहिती दिली.