पुणे : भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘पु.ल स्मृती सन्मान’ तर ’मंगेशकर’ या पंचाक्षरी अमिट नाममुद्रेतील एक सर्जनशील, प्रतिभावान संगीतकार अशी ओळख असलेल्या हदयनाथ मंगेशकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर व शब्दविरहित बोलक्या चित्रांच्या माध्यमातून ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने पाच दशकांहून अधिक काळ रसिकांच्या चेह-यावर हास्यलकेर उमटविणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द फडणीस यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पु.ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पु.ल परिवार’ आणि ‘आशय सांस्कृतिक’ च्या वतीने आयोजित यंदाच्या पुलोत्सवात या संगीत, कला, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव केला जाणार आहे. येत्या 17 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पुण्यात ‘पुलोत्सव’ रंगणार आहे. पुलोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात पं. हदयनाथ मंगेशकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
गुरूवार दि. 22 नोव्हेंबर रोजी डॉ. जयंत नारळीकर यांचा विशेष सन्मान ज्येष्ठ साहित्यिक द.मा मिरासदार यांच्या हस्ते होणार आहे तर शुक्रवार दि. 23 नोव्हेंबर रोजी शि.द फडणीस यांना ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. पुलोत्सवाच्या समारोपात ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते ‘पु.लं स्मृती सन्मान’ प्रदान केला जाणार आहे. यावेळी झाकीर हुसेन यांच्याशी डॉ. पटेल संवाद साधणार आहेत.