दौंड : पेडगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीपात्रातून सव्वातीन लाख रुपयांची वाळू चोरून नेल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणेअंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली. ‘आमच्यावर वाळूचोरीचा गुन्हा दाखल केल्यास विष पिऊन आत्महात्या करू,’ अशी धमकी एका वाळूमाफियाने महसूल पथकाला दिली. मात्र, या वाळूमाफियाची कुठलीही मुजोरी सहन न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना तहसीलदार उत्तम दिघे यांनी दिल्या. त्यानुसार दीपक इंदलकर, काळू खरात, नीलेश चव्हाण, संतोष काळे (सर्व रा. पेडगाव, ता. दौंड) यांच्यावर वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पेडगाव येथे भीमा नदीपात्रात बेकायदेशीर वाळूउपसा सुरू आहे, अशी माहिती महसूल खात्याला मिळाली. त्यानुसार स्वत: तहसीलदार उत्तम दिघे आणि त्यांचे पथक मंगळवारी (दि. १९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घटनास्थळी गेले. या वेळी सव्वातीन लाख रुपयांची सुमारे २०० ब्रास वाळू चोरट्यांनी पळवली. साधारणत: पेडगाव ते जलालपूरपर्यंत वाळूमाफियांचा महसूल खात्याच्या पथकाने दुचाकीवरून पाठलाग केला. मात्र, वाळूचोर पळून गेले. भीमा नदीपात्रातील बहुतांश भाग कोरडा पडल्याने वाळूमाफियांना वाळूचोरीला सोपे झाले आहे. (वार्ताहर)
वाळूचोरी प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
By admin | Published: April 21, 2016 1:13 AM